संशयित मृताची देखील पीसीआर चाचणी होणार; आयसीएमआरची नवीन नियमावली

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 मे 2020

एखाद्या कोरोनाग्रस्ताचा मृत्यू  झाला तरी त्याचा अहवाल कोरोना  निगेटिव्ह दाखविण्याचे प्रकार वाढू लागल्याचे वृत्त आहे.  त्याची गंभीर दखल घेत आयसीएमआरने नवीन  निर्देश दिले आहेत. 

नवी दिल्ली - कोरोनाच्या संक्रमित रुग्णांबरोबरच संशयित रुग्णाचा मृत्यू जरी झाला त्याचा मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यापूर्वी त्याच्या नाकातील द्रवाची पीसीआर चाचणी करणे यापुढे बंधनकारक राहणार आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच-आयसीएमआरने याबाबतची नियमावली जारी केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनाग्रस्तांच्या वाढीचा कल कायम आहे. गेल्या आठवडाभर रोज ५ हजाराहून जास्त नवे रुग्ण सापडत असून दररोज मृतांची संख्या दीडशे आकडा पार करून जात आहे. देशात कोविड महामारीचे सामूहिक संक्रमण म्हणजेच कम्युनिटी स्प्रेड झाले नसल्याचा दावा आरोग्य मंत्रालय करत असले तरी मे महिन्यातील रोजची रुग्ण संख्या भीतीदायक कल दर्शवत आहे. यापार्श्वभूमीवर आयसीएमआर चाचण्यांच्या संदर्भात वरचेवर सुधारित दिशानिर्देश जारी करत आहे. स्टॅंडर्ड गाईडलाईन्स फॉर मेडिको लीगल अटॉप्सी इन कोविड-१९ डेथ इन इंडिया' या नव्या दिशा निर्देशानुसार कोरोना रुग्ण किंवा संशयितांचा मृत्यू झाला तर मृतदेह शवागारात पाठविण्याआधी त्याच्या नाकातील द्रवाची प्रयोगशाळेत तपासणी करणे व अहवाल सादर करण्याचे संबंधित रुग्णालयांवर सक्तीचे राहणार आहे. रुग्णाच्या मृत्यूनंतर अतिदक्षता विभागातच ही सॅम्पल्स घेण्यात यावीत, असे यात म्हटले आहे. या पीसीआर चाचणीचा अहवाल आल्यानंतरच मृतदेह संबंधित जिल्हा प्रशासनाकडे सोपविता येईल. नवीन चाचणी नियम सर्व प्रकारच्या रुग्णांच्या मृतदेहांना लागू राहणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

एखाद्या कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला तरी त्याचा अहवाल कोरोना निगेटिव्ह दाखविण्याचे प्रकार वाढू लागल्याचे वृत्त आहे. त्याची गंभीर दखल घेत आयसीएमआरने नवीन निर्देश दिले आहेत. यात पुढे म्हटले आहे की 

- रुग्णाच्या नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी त्यावरील प्लास्टिक बॅगचे आवरण काढता कामा नये. 
- मृतदेहाजवळ दोन पेक्षा जास्त नातेवाईकांना थांबता येणार नाही 
- अंत्यसंस्कारावेळी पाचपेक्षा जास्त नातेवाईकांना उपस्थित राहता येणार नाही 
-ज्यांनी मृतदेह ताब्यात घेतला किंवा अंत्यसंस्कार केले त्यांना विलगीकरण प्रक्रियेतून सक्तीने जावे लागेल 
- शक्यतो विद्युतदाहिनीतच दहन केले जावे. 
-ज्यांचा दफन करण्याचा आग्रह असेल, त्यांनी दफनविधीसाठी किमान सहा ते आठ फूट खड्डा खणला पाहिजे. 
- कोरोनाग्रस्तांचे दफन तेथे केले जाईल त्या जागेला सिमेंटने पक्के करण्यात यावे. 
- मृत्युमुखी पडलेल्या कोरोनाग्रस्ताच्या अंत्यसंस्कारांपूर्वी अंघोळ घालणे, मिठी मारणे, स्पर्श करणे, मुके घेणे यासारख्या प्रथांवर बंदी असेल. 
- अंत्यसंस्कारानंतर राख ठेवून घेण्याची परवानगी मिळेल. 
- कोविड-१९ रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याचे कपडे आणि सामान जाळून नष्ट करणे बंधनकारक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suspected dead body be tested by PCR new regulations of ICMR