स्वच्छ सर्वेक्षणात राज्याची घोडदौड; नवी मुंबईसह पाच शहरे पहिल्या वीसमध्ये

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 21 August 2020

या वर्षीच्या सर्वेक्षणात राष्ट्रीय १२पुरस्कारांपैकी सर्वाधिक ४ पुरस्कारांसह अन्य१३असे एकूण १७पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत.इंदूर शहराने सलग चौथ्या वेळेस देशातील सर्वांत स्वच्छ शहराचा मान मिळवला.

नवी दिल्ली - केंद्रीय नगर विकास मंत्रालयातर्फे झालेल्या स्वच्छ शहर सर्वेक्षण मोहिमेत सर्वाधिक पुरस्कार मिळवून महाराष्ट्राने घोडदौड कायम राखली आहे. या वर्षीच्या सर्वेक्षणात राष्ट्रीय १२ पुरस्कारांपैकी सर्वाधिक ४ पुरस्कारांसह अन्य १३ असे एकूण १७ पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत. इंदूर शहराने सलग चौथ्या वेळेस देशातील सर्वांत स्वच्छ शहराचा मान मिळवला. सुरत दुसऱ्या क्रमांकावर तर नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

पहिल्या वीस स्वच्छ महानगरांच्या यादीत महाराष्ट्रातील पाच शहरे आहेत. दहा लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये छत्तीसगडमधील अंबिकापूर शहर अव्वल ठरले आहे. या यादीत चंद्रपूर (४) धुळे ( ९) अंबरनाथ (१८) मिरा भाइंदर ( १९) आणि पनवेल (२०) ही महाराष्ट्रातील शहरे आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

नवी दिल्ली येथे केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या उपस्थितीत झालेल्या या ऑनलाइन सोहळ्यास नगरविकास मंत्री एकनाश शिंदे , राज्यमंत्री प्रसाद तनपुरे, लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव आदी यावेळी उपस्थित होते. मोठ्या राज्यांच्या मानांकनात महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळाला आहे. छत्तीसगड पहिल्या, मध्य प्रदेश तिसऱ्या आणि गुजरात चौथ्या क्रमांकावर आहे. यंदा प्रथमच केलेल्या गंगा नदीच्या किनाऱ्यावरील ९७ शहरांच्या सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेले वाराणसी शहर सर्वांत स्वच्छ ठरले आहे.  सलग तिसऱ्या वर्षी देशातील सर्वाधिक पुरस्कार मिळवत महाराष्ट्राने यंदा ‘हॅट्रीक’ साधली आहे.

केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सांगितले की, या वर्षीचा सर्व्हे हा संपूर्णपणे ‘पेपरलेस’ घेण्यात आला. देशातील एक हजार २४२ शहरांमध्ये स्वच्छतेबाबत सर्वेक्षण करण्यात आले. त्यात १ कोटी ८७ लाख लोकांनी सहभाग नोंदवला.२८ दिवसांमध्ये हे सर्व सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अन्‍य श्रेणींमधील यश
- राष्ट्रीयस्तरावरील १०० अव्वल अमृत शहरांपैकी महाराष्ट्रातील ४३ पैकी ३१ शहरांचा समावेश.
- राज्यातील ७५ टक्के अमृत शहरांचा पहिल्या १०० शहरांमध्ये समावेश. 
- देशातील बिगर अमृत शहरांपैकी २५पैकी २० महाराष्ट्रातील.
- कचरामुक्त राष्ट्रीय तारांकित १४१ शहरांमध्ये महाराष्ट्रातील ७७ शहरांचा समावेश.
- संपूर्ण राज्य हागणदारी मुक्त असून राज्यातील २१६ शहरे ‘ओडीएफ प्लस’ तर ११६ शहरे ‘ओडीएफ प्लस प्लस’.

महाराष्ट्रातील स्वच्छ शहरे

नवी मुंबई 
नाशिक ११
ठाणे १४
पुणे  १५
नागपूर  १८
कल्याण डोंबिवली २२
पिंपरी चिंचवड २४
औरंगाबाद २६
वसई-विरार ३२
मुंबई  ३५

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: swachh survekshan 2020 Navi mumbai came third in the country