Swasthyam 2023 : दिल्लीचेही तख्त राखतो... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swasthyam 2023 Mahadji Shinde's contribution to Indian history

भारताच्या इतिहासात महादजी शिंदे यांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण

Swasthyam 2023 : दिल्लीचेही तख्त राखतो...

- प्रशांत सरुडकर

भारताच्या इतिहासात महादजी शिंदे यांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सातारा जिल्ह्यातील कण्हेरखेड हे त्यांचे मूळ गाव. इसवी सन १७६०मध्ये बुराडी घाटात झालेल्या युद्धात नजीबखान रोहिला व कुतुबशाह यांच्याविरुद्ध लढताना दगडी गोळा लागून दत्ताजी घोड्यावरून खाली पडले, त्या वेळेला कुतुबशहाने त्यांना कुत्सितपणे विचारले ‘‘क्यों पाटील, और भी लढोगे.’’

यावर दत्ताजी यांनी अतिशय स्वाभिमानी उत्तर दिले, ‘‘क्यों नहीं, बचेंगे तो और भी लढेंगे.’’ हाच स्वाभिमान घेऊन महादजींनी पुढील राजकारण केले. पानिपतच्या युद्धानंतर शिंदे घराण्याची सगळी सूत्रे महादजींच्या हाती आली.

वडगावच्या लढाईत इंग्रजांचा महादजींनी पराभव केला. सतलजपासून तुंगभद्रेपर्यंत महादजी शिंदे यांच्या कर्तृत्वाचा दरारा निर्माण झाला. या देशातील पहिली कवायती फौज त्यांनी स्थापन केली. यामध्ये तीस हजार पायदळ व तीस हजार घोडदळ होते.

आग्रा येथे तोफा ओतण्याचा कारखाना काढला. १२ फेब्रुवारी१७९४ रोजी त्यांचे पुण्याजवळील वानवडी येथे निधन झाले. इसवी सन १७८८मधील प्रसंग आहे. नजीबखान रोहिल्याचा नातू गुलाम कादर याने मोगल सम्राट शहाआलम द्वितीय याला गादीवरून खाली खेचले, त्याचे डोळे काढले व बंदिवासात टाकून, स्वतः सिंहासनावर जाऊन बसला. या वेळेला दिल्लीचे रक्षणकर्ते मराठी होते.

महादजी मथुरेत होते. ही गोष्ट त्यांना समजताच त्यांनी राणा खान, लकबा लाड या सरदारांना त्वरेने दिल्लीकडे पाठवले. मराठ्यांचे सैन्य येत आहे, हे पाहिल्यानंतर गुलाम कादर दिल्लीतून पळाला. मराठ्यांनी शहा आलम याला दिल्लीच्या गादीवर पुन्हा बसवले.

ते गुलाम कादरचा पाठलाग करू लागले, शामली या गावाजवळ तो सापडला. गुलाम कादरला दिल्लीला आणून राजाच्या आज्ञेने त्याचा शिरच्छेद करण्यात आला. राजा खूष झाला व त्याने दिल्लीच्या किल्ल्यावर मराठ्यांना स्वतःचे निशाण लावायची परवानगी दिली. हे निशाण पुढे १८०३पर्यंत, म्हणजे इंग्रजांनी दिल्ली जिंकेपर्यंत पंधरा वर्ष दिल्लीवर फडकत होते दिल्लीचा राजा कोण असावा, हे मराठे ठरवत होते. म्हणूनच अभिमानाने आपण म्हणतो, ‘दिल्लीचेही तख्त राखतो, महाराष्ट्र माझा.’

टॅग्स :IndiaDesh newsHistory