शेतातलं पीक वाचलं पण हत्ती जिवाला मुकला; वीजेचा धक्का बसल्याने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

 हत्ती शेतात घुसून पीकाचं नुकसान करतात म्हणून लावण्यात आलेल्या वीजेच्या तारांमुळे हत्तीचा मृत्यू झाल्याची घटना तामिळनाडुमध्ये घडली आहे. याआधीही अशा प्रकारच्या घटना तामिळनाडु, केरळसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये घडल्या आहेत. 

सिरुमुगई - हत्ती शेतात घुसून पीकाचं नुकसान करतात म्हणून लावण्यात आलेल्या वीजेच्या तारांमुळे हत्तीचा मृत्यू झाल्याची घटना तामिळनाडुमध्ये घडली आहे. याआधीही अशा प्रकारच्या घटना तामिळनाडु, केरळसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये घडल्या आहेत. पुधुक्कडु गावाजवळ असेल्या सिरुमुगई जंगलात वीजेचा धक्का बसून हत्तीचा मृत्यू झाला. सिरुमुगई जंगल कोइमतून जिल्ह्यात आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, स्थानिकांनी सांगितल्यानुसार वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्यांनी हत्ती ज्या ठिकाणी मृतावस्थेत आढळला तिथं तपासणी केली. त्याठिकाणी शेताभोवती तारेचं कुंपण आणि त्याला वीजेचं कनेक्शन जोडल्याचं आढळून आलं. हत्ती शेतात घुसत असताना वीजेच्या तारेचा धक्का बसल्याची शक्यता असल्याची माहिती वनविभागाने दिली. हत्तीचा मृतदेह शवविच्चेदनासाठी पाठवण्यात आला आहे. 

वनविभागाच्या अधिकाऱ्यांना असं आढळलं की, शेतमालकाने शेतात वन्य प्राणी घुसू नयेत म्हणून भोवतीने वीजेच्या तारा लावल्या होत्या. तसंच शेतकऱ्याने यासाठी सरकारी मोटर रूममधून वीज कनेक्शन चोरल्याची माहितीही समोर आली आहे.

हे वाचा - नवा कृषी कायदा शेतकऱ्यासाठी ठरला फायदेशीर; तक्रार दाखल करताच मिळाली भरपाई

याप्रकरणी वनविभागाने शेतमालकाला नोटिस पाठवली आहे. मात्र शेतमालकाने सुरुवातीला असं काही केलं नसल्याचं म्हटलं. पण पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. मुरुगसेन असं नाव असलेल्या शेतकऱ्याने वीजचोरी केल्याचं आणि शेतात वीजेच्या तारा लावल्याचं मान्य केलं. या तारा शेतातील पीकाचं वन्य प्राण्यांनी नुकसान करू नये यासाठी लावल्याचंही त्याने कबूल केल्याचं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रकरणी शेतकऱ्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tamil nadu elephant death electrocuted Pudhukkadu