Tamil Nadu Loksabha Election Result : तमिळनाडू : द्रमुकने गड राखला

प्रत्येक निवडणुकीत कल बदलता ठेवणाऱ्या तमिळनाडूने यंदा ती प्रथा मोडीत काढली.
mk stalin
mk stalinsakal

प्रत्येक निवडणुकीत कल बदलता ठेवणाऱ्या तमिळनाडूने यंदा ती प्रथा मोडीत काढली. मागील लोकसभा निकालाचा कल कायम राखताना सत्ताधारी द्रमुकची आघाडी यंदाही मतदारांच्या पसंतीस उतरल्याचे स्पष्ट झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावाती प्रचारानंतरही मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे संयमी निवडणूक डावपेचच यशस्वी ठरल्याचे दिसते; मात्र हे जरी खरे असले तरी भारतीय जनता पक्षाच्या मतांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट दिसून आले.

अण्णाद्रमुकलाही या निवडणुकीत सपशेल पराभव स्वीकारावा लागला. द्रमुकने आघाडी करताना दाखविलेली चतुराई, भाजपचा वाढत असलेला मतांचा टक्का आणि नेतृत्वहीन अण्णाद्रमुकची भरकटलेली वाटचाल ही या निवडणुकीची ठळक वैशिष्ठ्ये ठरली. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि अण्णाद्रमुक यांच्यात युती करण्याबाबत चर्चा फिस्कटली आणि भाजपने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला.

दुसरीकडे सत्ताधारी द्रमुकने एकट्याने लढून विजय मिळविता येणार नाही हे जाणून कॉंग्रेस, वीसीके (विदुथलाई चिरूथईगल काची), सीपीआय, सीपीआय (एम), एमडीएमके (मरुमलार्ची द्रविड मुन्‍नेत्र कळघम), आईयूएमएल (इंडियन युनियन मुस्लिम लीग) यांना एकत्र येण्याची हाक दिली आणि त्यांची सुयोग्य अशी मोट बांधली.

या आघाडीचे नेतृत्व करताना स्टॅलिन यांनी जागा वाटपावेळी कोणताही तिढा निर्माण होणार नाही याची काळजी घेतली. ३९ पैकी स्वतःकडे २२ जागा घेताना १७ जागा काँग्रेससह मित्रपक्षांना देऊन विजयाची पायाभरणी केली. सर्वत्र एकजिनसी प्रचार करताना भाजपचा हिंदी आग्रह झिडकारण्यात यश मिळविले. मतांचे ध्रुवीकरण करताना दलित आणि अल्पसंख्याक मतांना एकत्र करण्यात यश मिळविले.

द्रमुकने २२ जागा जिंकताना २५.८५ टक्के मते मिळविली तर काँग्रेसने ९ जागा मिळविताना १०.७० टक्के मते मिळविली. निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला एकही जागा मिळालेली नसली तरी १०.७४ टक्के मते मिळविण्यात यशस्वी ठरले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष अन्नमलाई यांनी त्यासाठी घेतलेले कष्ट महत्त्वाचे ठरले. त्यांनी द्रमुकला एकहाती लढत दिली आणि द्रमुकची दमछाक केली.

दुसरीकडे अण्णाद्रमुकला एकही जागा मिळाली नसली तरी २०.४६ टक्के मते मिळवण्यात यश मिळविले आहे. हे दोन्ही पक्ष एकत्र आले असते तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते. कोईंमतूरमधून गणपती राजकुमार यांनी अन्नमलाई यांचा पराभव केला तर भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या कनिमोळी याही दीड लाखांवर मताधिक्क्याने विजयी ठरल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com