esakal | कोविडविरोधातील लढ्यासाठी 'टाटा ग्रुप' मिशन मोडवर; २००० कोटी रुपये करणार खर्च!
sakal

बोलून बातमी शोधा

Ratan TaTa

लढा कोरोनाशी! टाटा ग्रुप करणार 2 हजार कोटींचा खर्च

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : कोविडच्या उद्रेकानंतर देशातील आरोग्य व्यवस्थेवर आलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता कॉर्पोरेट्स क्षेत्रानं देखील वैद्यकीय क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दृष्टीने हातभार लावण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये टाटा ग्रुपने देखील मोठी उडी घेतली असून कोविडविरोधातील लढ्यासाठी टाटा ग्रुप ऑफ कंपनीज मिशन मोडवर आहेत. यासाठी येणाऱ्या खर्चाला टाटा ग्रुपने कुठलीही मर्यादा ठेवलेली नाही. मात्र, तरीही यासाठी साधारण २,००० कोटी रुपये खर्च करणार असल्याचं कळतं.

टाटा ग्रुप कंपनीजचं कोविड क्रिटिकल केअरच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आपलं वजन वापरणार आहे. यासाठी निधी उभारण्याबरोबरच विविध स्त्रोतांच्या माध्यमातून हजारो हॉस्पिटल्स उभारण्यात येणार आहेत. तसेच ऑक्सिजनचं नियोजन आणि हेल्थकेअर स्टाफला ट्रेनिंग यासारख्या गोष्टींचाही यामध्ये समावेश आहे. यासाठी टाटा ग्रुप सुमारे २,००० कोटी रुपये खर्च करणार असलं तरी यासाठी खर्चाच्या मर्यादेचं बंधन ठेवलेलं नाही. टाटा ट्रस्टचे चेअरमन रतन टाटा आणि टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी याबाबत निर्देश दिले आहेत. इकॉनॉमिक टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे.

लस निर्मिती कंपन्यांसोबत टायअप करणार

कोविडच्या या काळात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी टाटा ग्रुपमधील बनमाली अग्रवाल, प्रेसिडेंट ग्रुप ऑफ हॉटेल्स, टाटा इन्फ्रास्ट्रक्चर, डिफेन्स अँड एअरोस्पेस, टाटा सन्स, टाटा स्टील, टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम, टाटा मोटर्स, इंडियन हॉटेल्स, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, टाटा इंटरनॅशनल, व्होल्टास, टाटा प्रोजेक्ट या कंपन्या काम करत आहेत. यांपैकी काही कंपन्यांनी गेल्या वर्षी कोविड काळ सुरु झाल्यानंतर जीवरक्षक उपकरणं उपलब्ध करुन देण्यात मदत केली होती. टाटा ग्रुप लस निर्मिती कंपन्यांसोबत टायअप करण्याच्याही विचारात आहे.

टाटाचा ट्रेनिंग प्रोग्रामही सुरु

टाटा ग्रुपमधील या प्रत्येक कंपनीने काही टीम्स तयार केल्या आहेत. या टीम दररोज पायाभूत सुविधांबाबत चर्चा, नियोजन आणि सहकार्य करण्याचं काम करतात. यामध्ये हॉस्पिटल्स बेट, ऑक्सिजन आणि लस याबाबत चर्चा सुरु असते. त्याचबरोबर टाटा ट्रस्टने वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेज येथे स्वयंसेवकांसाठी हेल्थकेअर ट्रेनिंग प्रोग्रामही सुरु केला आहे.

टाटांच्या हॉटेल्समध्ये १४०० बेड्स उपलब्ध

टाटा ग्रुपमधील इंडियन हॉटेल, जिंजर अँड प्रेसिडंट ग्रुप ऑफ हॉटेल्स यांनी १,४०० बेड्स हे मेडिकल सुपरव्हिजनसाठी दिले आहेत. या बेडवरील जे रुग्ण गंभीर असतील त्यांना नंतर गरज पडेल तसं रुग्णालयात शिफ्ट करण्यात येणार आहे. ज्या हॉटेल्सवर रुग्णालये आहेत त्याच ठिकाणी प्रामुख्याने हे बेड्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. कारण रुग्णाला वेळेत रुग्णालयात हालवता यावं. त्याचबरोबर टाटा प्रोजेक्ट्सनं स्थलांतरीत कामगारांसाठी जेवण आणि राहण्याची व्यवस्थाही केली आहे. त्याचबरोबर टाटा इंटरनॅशनल, व्होल्टास आणि ट्रेन्ट यांनी आपली वेअर हाऊसही गंभीर परिस्थितीतील पायाभूत सुविधा उभारण्यासाठी दिली आहेत.

loading image
go to top