आता 'भारतरत्न'चीही पुरस्कार वापसी; हजारिका कुटुंबीय नाकारणार सर्वोच्च सन्मान!

वृत्तसंस्था
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

आसाममध्ये नागरिकत्वाच्या मुद्यावरून मोठा वाद सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर भूपेन हजारिका यांना देण्यात आलेला सन्मान न स्वीकारण्याचा निर्णय त्यांचा मुलगा तेज हजारिका यांनी जाहीर केला आहे. या निर्णयामुळे पुन्हा मोठे वादंग निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. 'भारतरत्न' नाकारण्याची घटना यापूर्वी घडलेली नाही.

नवी दिल्ली : दिवंगत गायक भूपेन हजारिका यांना केंद्र सरकारतर्फे प्रदान करण्यात आलेला 'भारतरत्न' पुरस्कार परत करण्याचा निर्णय हजारिका कुटुंबीयांनी घेतला आहे. भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

आसाममध्ये नागरिकत्वाच्या मुद्यावरून मोठा वाद सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर भूपेन हजारिका यांना देण्यात आलेला सन्मान न स्वीकारण्याचा निर्णय त्यांचा मुलगा तेज हजारिका यांनी जाहीर केला आहे. या निर्णयामुळे पुन्हा मोठे वादंग निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. 'भारतरत्न' नाकारण्याची घटना यापूर्वी घडलेली नाही.

तेज हजारिका यांनी आज (सोमवार) रात्री उशीरा एक पत्रक जाहीर करून स्वत:ची भूमिका स्पष्ट केली. 'हजारिका यांचे नाव त्या वादग्रस्त विधेयकाशी जोडले जात आहे. या विधेयकाद्वारे आसाममध्ये आणि ईशान्य भारतामध्ये अस्वस्थता निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत हजारिका यांच्या नावाने 'भारतरत्न' जाहीर करून चुकीचा संदेश दिला जात आहे. या परिस्थितीत हजारिका यांना 'भारतरत्न' देऊन देशात शांतता नांदणार नाही आणि सुबत्ता येणार नाही', असे तेज हजारिका यांनी म्हटले आहे.

मोदी सरकारने आसाममध्ये नागरिकत्व कायदा लागू करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. अवैधरित्या भारतामध्ये राहणार्‍या नागरिकांना येथून बाहेर काढण्यासाठी ही मोहीम असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, स्वत:चे भारतीयत्व सिद्ध करण्यासाठीच्या अटी जाचक असल्याचे काही संघटनांचे म्हणणे आहे. यावरून आसाम आणि ईशान्य भारतामध्ये राजकीय अस्वस्थता आहे.

Web Title: Tej Hazarika refuses to accept Bharat Ratna conferred on Bhupen Hazarika