तेलंगण 7 एप्रिलला कोरोनामुक्त होणार : मुख्यमंत्री

वृत्तसंस्था
Monday, 30 March 2020

तेलंगणमध्ये एकूण 70 रुग्ण सापडले आहेत. त्यातील 11 जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. त्यांना सोमवारी घरी सोडण्यात येणार आहे. या रुग्णांना सर्व योग्य ती औषधे घरीही पुरविण्यात येणार आहेत. 58 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

हैदराबाद : तेलंगणमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले 70 रुग्ण सापडले असले तरी त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरु आहेत. त्यामुळे 7 एप्रिलला तेलंगण कोरोनामुक्त होईल, असा विश्वास तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी व्यक्त केला आहे.

राव म्हणाले, ''तेलंगणमध्ये एकूण 70 रुग्ण सापडले आहेत. त्यातील 11 जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. त्यांना सोमवारी घरी सोडण्यात येणार आहे. या रुग्णांना सर्व योग्य ती औषधे घरीही पुरविण्यात येणार आहेत. 58 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. परदेशातून आलेल्या 25 हजार 937 नागरिकांना सरकारच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. या सर्वांचा क्वारंटाईन कालावधी 7 एप्रिलला संपुष्टात येत आहे. त्यानंतर राज्यात कोरोनाचा एकही रुग्ण राहणार नाही. लॉकडाऊनच्या काळात स्वतःवर नियंत्रण ठेवणे हे सर्वांत महत्वाचे आहे.''

गावातील नागरिकांना अन्नधान्य पुरविण्याची सोय करण्यात आली आहे. 3200 कोटींचे अन्नधान्य मार्केटमध्ये आणण्यात आले आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्व नियम पाळण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी त्यांचा शेतमाल मागितल्यानंतर पैसे थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. सर्व शहरांच्या, गावांच्या सीमा बंद करण्यात आल्याचे, राव यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Telangana will be coronavirus-free by April 7 says Chandrashekhar Rao