दहा आमदारांनी घेतली कर्नाटकात मंत्रिपदाची शपथ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

नाराजांची समारंभाकडे पाठ
मंत्रिपदावर डोळा ठेवून असलेले उमेश कत्ती, अरविंद लिंबावळी, माजी मंत्री सी. पी. योगेश्वर व अन्य काही भाजप आमदारांनी आज शेवटच्या क्षणापर्यंत मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर मंत्रिपदासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. उमेश कत्ती यांनी तर आज पहाटेही येडियुरप्पा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मंत्रिपदाचा आग्रह धरला; परंतु पक्षश्रेष्ठींच्या आदेशापुढे आपण हातबल असल्याचे त्यांनी सांगितल्याचे समजते. उमेश कत्ती, अरविंद लिंबावळी, माजी मंत्री सी. पी. योगेश्वर शपथग्रहण समारंभाला अनुपस्थित राहिले. विशेष म्हणजे मंत्री के. एस. ईश्वरप्पा व उपमुख्यमंत्रिपदाचे दावेदार श्रीरामलूही शपथग्रहण समारंभाला उपस्थित नव्हते. शनिवारी (ता. ८) खातेवाटप करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बंगळूर - काँग्रेस आणि जेडीएसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या व पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या १० आमदारांचा गुरुवारी मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. राजभवनात झालेल्या शपथग्रहण समारंभात राज्यपाल वजूभाई वाला यांनी त्यांना अधिकार व गोपनीयतेची शपथ दिली. मात्र, मंत्रिपदाची अपेक्षा बाळगून असलेल्या मूळ भाजप आमदारांना धक्का दिल्याने त्यांची घोर निराशा झाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दहा नवीन मंत्र्यांमध्ये रमेश जारकीहोळी (गोकक), भैरती बसवराज (केआर पुरम), बी. सी. पाटील (हिरेकरूर), एस. टी. सोमशेखर (यशवंतपूर), आनंद बी. सिंह (विजयनगर), शिवराम हेब्बार (यल्लापूर), के. सुधाकर (चिक्कबळ्ळापूर), नारायणागौडा (कृष्णराजपेट), श्रीमंत पाटील (कागवाड) आणि के. गोपालय्या (महालक्ष्मी लेआउट) यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळात नूतन १० मंत्री सामील झाले; परंतु काँग्रेसचे आणखी एक बंडखोर आमदार महेश कुमठळ्ळी यांना वगळण्यात आले, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten MLAs take oath as minister in Karnataka