काश्‍मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचा सुपुत्र हुतात्मा

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 24 September 2020

मोटारसायकलवरून आलेल्या दहशतवाद्यांनी गुरुवारी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या पथकावर गोळीबार केला

श्रीनगर- काश्‍मीरमधील बडगाम जिल्ह्यात मोटारसायकलवरून आलेल्या दहशतवाद्यांनी गुरुवारी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या पथकावर गोळीबार केला. यात ‘सीआरपीएफ’चे सहाय्यक उपनिरीक्षक नरेश उमराव बडोले हे हुतात्मा झाले. ते मूळचे महाराष्ट्रातील नागपूरच होते. हल्‍ल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांची बंदूक हिसकावून घेतली.
 

बडगाममधील कैसरमुल्ला भागात‘सीआरपीएफ’च्या ११७ व्या तुकडीवर सुरक्षा पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. यात बडोले जखमी झाले. त्यांना विशेष उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हल्‍ल्यानंतर पलायन करणाऱ्या दहशतवाद्यांनी बडोले यांची बंदूक हिसकावून नेली. या घटनेनंतर हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेतला.

 

बडोले मूळचे बाम्हणी गावचे आहेत. त्यांचा 24 एप्रिल 1971 साली त्यांचा जन्म झाला होता. 1989 साली ते सीआरपीएलमध्ये रुजू झाले. दहशतवाद्यांनी बडोले यांच्या पथकावर अंदाधुंद गोळीबार केला होता. यात ते जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: terrorist attack in kasmir maharashtra soldier naresh badole died