
नरेंद्र मोदी पोहोचण्याआधीच जम्मूत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, छावणीचं स्वरुप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू- काश्मीर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सावध झाल्या असून खोऱ्यातील सुरक्षा बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. मोदींचा आज सांबा जिल्ह्यात दौरा आहे. या जिल्ह्यातील पल्ली पंचायतीला ते भेट देणार असून त्यांच्या हस्ते वीस हजार कोटी रुपयांच्या विकासकामांची पायाभरणी करण्यात येईल.
मात्र, त्याआधीच घडामोडींना वेग आला आहे. नरेंद्र मोदी काश्मीरमध्ये पोहोचण्याआधी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलंय. हे दोनही दहशवादी पाकिस्तानचे असल्याचे पुरावे यंत्रणांच्या हाती लागले आहेत.
सशस्त्र हल्ले... ग्रेनेड्स आणि 'दहशत राज'
सुजवानमधील लष्करी तळावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलिस आणि सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केल्याने दहशतवादी मोठा घातपात घडवून आणण्याच्या तयारीत असावेत असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
जम्मूपासून १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या पल्ली पंचायत परिसरामध्ये पोलिस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले असून सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) देखील परिस्थितीवर करडी नजर ठेवून असेल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या कारवाईत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली असून सुलतान पठान आणि झबीउल्लाह असं या दोघांचं नाव आहे. दोघेही पाकिस्तानचे रहिवाशी असल्याचं समोर आलं असून अजून दोन दहशतवादी लपले असल्याची माहिती काश्मिरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली.
दरम्यान त्यांच्याकडून 2 एके रायफल, 7 एके मॅगझिन आणि 9 ग्रेनेड जप्त करण्यात आले असून दहशतवाद्यांचा शोध अजूनही सुरू असल्याची माहिती विजय कुमार यांनी दिली.
Web Title: Terrorist Killed In Kulgam Before Narendra Modi Kashmir Visit
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..