फक्त 1 रुपयात पोटभर जेवण!

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 28 October 2020

या खाणावळीत फक्त 1 रुपयाला थाळी दिली जात आहे. या थाळीत पोट भरेल इतकं जेवन दिलं जात आहे.

दिल्ली: कोरोनामुळे सध्या देशाची अवस्था मोठी बिकट झाली आहे. याकाळात बऱ्याच लोकांचा उपासमारीमुळे मृत्यू झाला आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्या जाऊन ते लोक बेकार आणि बेरोजगार झाले आहेत. कोरोनाकाळात उपासमारी हा जगासमोरची सर्वात मोठी अडचण ठरली आहे.

देशात कोरोनाकाळात काही ठिकाणी बऱ्याच जणांनी मोफत जेवण दिले होते. त्यामध्ये दिल्लीतील एका खाणावळीत खूप चांगला उपक्रम राबविला जात आहे. दिल्लीतील या खाणावळीत फक्त 1 रुपयाला थाळी दिली जात आहे. या थाळीत पोट भरेल इतकं जेवन दिलं जात आहे. दिल्लीतील नांग्लोई भागातील शिव मंदिराजवळ असणाऱ्या 'शाम रसोई' या खाणावळीत हा उपक्रम केला जात असून याद्वारे गरिबांना फक्त 1 रुपयात जेवण दिले जात आहे. विशेष म्हणजे या थाळीमध्ये संपुर्ण जेवण दिले जात आहे.

ही खाणावळ दिवसातील दोन तास उघडी असते. ती दररोज सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत उघडी असून इथं लोकांना 1 रुपयात लोकांना पोटभर थाळी खाता येत आहे. या खाणावळीचे मालक दिल्लीतील प्रविण गोयल हे आहेत.

हे वाचा - UNLOCK 6 - शाळांसाठी मिशन बिगीन अवघडच; केंद्राच्या कठोर दिशानिर्देशाचे आव्हान

गोयल यांनी याबद्दलची अधिकची माहिती देताना सांगितले की, सुरुवातीला ही थाळी सर्वांना 10 रुपायाला दिली जात होती. बऱ्याच लोकांनी आर्थिक मदत केल्याने या थाळीची किंमत 1 रुपयांवर आणली गेली. त्यामुळे या जेवणाचा लाभ घेणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. दररोज या थाळीचा 1000 जण प्रत्यक्ष खाणावळीत येऊन जेवण करतात आणि बाहेर बऱ्याच ठिकाणी ई-रिक्शाद्वारे 1000 पार्सल पोहचवले जातात. 

प्रविण गोयल यांना रणजित सिंग या उद्योगपतींने खाणावळीसाठी जागा दिली आहे. शाम रसोईच्या थाळीत भात, चपाती, सोया पुलाव, पनीर, सोयाबीन आणि हलवा पदार्थ असतात. सकाळी 1 रुपयात चहाही या खाणावळीत मिळतो. शाम रसोईत 6 कामगार आहेत, ज्यांना दिवसाला 300-400 रुपयांच्या दरम्यान पगार दिला जातोय. तसेच या खाणावळीला मदत करण्यासाठी या भागातील विद्यार्थीही येतात. 

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thali of shyam rasoi in delhi only 1 rupees in corona period