esakal | रशियाची 'स्पुटनिक-व्ही' लस अखेर भारतात दाखल; पाहा व्हिडिओ

बोलून बातमी शोधा

sputnik v arrived in india
रशियाची 'स्पुटनिक-व्ही' लस अखेर भारतात दाखल; पाहा व्हिडिओ
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

रशियाची बहुचर्चित 'स्पुटनिक-व्ही' कोरोना प्रतिबंधक लस अखेर शनिवारीभारतात दाखल झाली. रशियावरुन विमानानं हैदराबादमध्ये या लसीची पहिली खेप दाखल झाली आहे. १ मे रोजी ही लस भारतात दाखल होणार असल्याचं यापूर्वीच रशियन सरकारनं जाहीर केलं होतं. आजपासूनच देशात लसीकरणाचा तिसरा आणि महत्वपूर्ण टप्पा सुरु झाला आहे. या टप्प्यात आता भारतीयांना स्पुटनिक लसही उपलब्ध होणार आहे.

देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं कहर केला आहे. दररोज मोठ्या संख्येनं रुग्ण रुग्णालयांमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे एकूणच आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. दरम्यान, देशात लसीकरण मोहिमही जोरात सुरु आहे. कोरोनाचा हा कहर नियंत्रणात यावा यासाठी जास्तीत जास्त वेगानं लसीकरण होणं गरजेचं आहे. यामध्ये जास्तीत जास्त लोकांना लस दिली गेल्यास संसर्गाचे प्रमाण घटण्यास मदत होऊ शकते. याच कारणामुळे भारतानं गेल्या महिन्यांत रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीला भारतात लसीकरणासाठी परवानगी दिली होती. त्यामुळे कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन नंतर आता स्पुटनिक-व्ही लसींचे डोस भारतीयांना उपलब्ध होणार आहेत. स्पुटनिक लस ही ९० टक्के प्रभावी असल्याचं चाचणीतील निष्कर्ष आहेत.

दरम्यान, १ मे रोजी स्पुटनिक लसीची पहिली खेप भारतात दाखल होईल, अशी माहिती काही दिवसांपूर्वी रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे (RDIF) प्रमुख किरील दमित्रिव यांनी दिली होती. RDIF सध्या जगभरात स्पुटनिक व्ही लसीचं मार्केटिंग करत आहे. दरम्यान, RDIFने पाच बड्या भारतीय लस उत्पादक कंपन्यांसोबत वार्षिक ८५ कोटींहून अधिक लसीचे डोस तयार करण्याचा करार केला आहे. त्याचबरोबर भारतात लवकरच या लसीचं उत्पादनही सुरु होऊ शकतं, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

स्पुटनिक लस सर्वात सुरक्षित

याशिवाय रशियन फार्मा कंपनी फर्मासिंटेजने सोमवारी म्हटलं होतं की, "रशियन सरकारची मंजुरी मिळताच कंपनी मे महिन्याच्या शेवटापर्यंत भारताला रेमडेसिव्हीर अँटिव्हायरल औषधाचे एक मिलियन डोस पाठवण्यास तयार आहे. त्याचबरोबर मेस्किकोच्या सरकारने स्पुटनिक व्ही बाबत एक महत्वाची पुष्टी केली आहे, ती म्हणजे त्यांच्या देशात वापल्या गेलेल्या सर्व लसींमध्ये स्पुटनिक व्ही ही सर्वात सुरक्षित लस आहे.