
आसाममधील पूरस्थिती गंभीरच
गुवाहाटी - ईशान्येकडी आसाम राज्यातील पूरस्थिती रविवारीही अत्यंत गंभीर होती. संततधार पावसामुळे अनेक नवीन भाग जलमय झाले. आसाममध्ये गेल्या सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस व दरडींमुळे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील ३० लाखांहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. एकूण ११८ महसूल मंडळांचा समावेश असणाऱ्या ३२ जिल्ह्यांतील ४,२९१ गावांना पुराचा वेढा पडला आहे.
दरम्यान, पुरामुळे आणखी आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे आसाममध्ये पूर व दरडीमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या ६२ वर गेली आहे. आसाममधील दिमा हसाओ, गोलपारा, कामरूप आदी जिल्ह्यांत नव्याने दरडी कोसळल्याचे वृत्त आहे. शनिवारी (ता. १८) रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आसामची राजधानी गुवाहाटीत अक्षरश: हाहाकर उडाला. शहरातील अनेक भागांत गुडघाभर पाणी साचले. काहीठिकाणी तर छातीइतक्या उंचीपर्यंत पाणी साचले होते.
गुवाहाटी महापालिकेचे आयुक्त देवाशिष शर्मा यांनी सांगितले, की अप्पर आसाममधील मुसळधार पाऊस व ब्रम्हपुत्रा नदीतील अतिरिक्त पाण्यामुळे गुवाहाटीत ब्रम्हपुत्रेच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली. नदीचे गुवाहाटीत येणारे पाणी रोखण्यासाठी प्रशासनाने ब्रम्हपुत्रेची उपनदी भारलूवरील दारे बंद केली.
मदत छावण्यांमध्ये आश्रय न घेतलेल्या लोकांनाही जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. त्यासाठी, ३०२ मदत केंद्रे तात्पुरत्या स्वरुपात सुरू करण्यात आली आहेत, अशी माहीती आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली.
Web Title: The Situation Is Serious In Assam
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..