
Earthquake in Uttarkashi : उत्तरकाशीला 2.5 रिक्टर स्केल भूकंपाचे तीन धक्के
Earthquake in Uttarkashi : उत्तरकाशी जिल्ह्यामध्ये मध्यरात्री भूकंपाचे तीन धक्के बसले आहे. जमीन हादरल्याने नागरिक भयभीत झाले होते. भारतीय हवामान विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार भूकंपाची तीव्रता २.५ रिक्टर स्केल आहे.
रात्री १२.४५ वाजता उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये भूकंप झाला. भूकंपाचे हादरे बसताच लोक घरातून बाहेर पडले. सुदैवाने अद्यापपर्यंत कुठलीही जीवितहानी झाली नाही. भूकंपाचा पहिला धक्का १२.४० वाजता बसला, दुसरा १२.४५ तर तिसरा झटका १ वाजून १ मिनिटाने बसला.
उत्तरकाशी येथील स्थानिक नागरिक हेमलता यांनी सांगितलं की, अचानक खिडकी, दरवाजांचा जोरात आवाज येऊ लागला. सोबत किचनमध्ये भांडे आदळत होते. एकानंतर एक असे भूकंपाचे तीन धक्के बसले. त्यामुळे घराबाहेर पडलेले लोक रात्रभर घराबाहेर बसून होते.
भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार रात्री १२.४५ वाजता बसलेला भूकंपाचा धक्का २.५ रिक्टर स्केलचा होता. त्याचं केंद्र भटवाडी तहसीलअंतर्गत सिरोर जंगलामध्ये होतं.
या भूकंपामुळे कुठेही नुकसान झाल्याची माहिती नाही. तसेच जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्येही भूकंपाचे हादरे बसले आहेत.