पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेले हेलिकॉप्टर कोसळले; तीन ठार

वृत्तसंस्था
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

राज्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी गेलेले हेलिकॉप्टर परतत असताना उत्तरकाशी जिल्ह्यातील मोरी ते मोल्डी परिसरात दुर्घटनाग्रस्त झाले.

डेहराडून : उत्तराखंडमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेले हेलिकॉप्टर आज (बुधवार) दुपारी दुर्घटनाग्रस्त झाले. येथील उत्तर काशी भागात हे हेलिकॉप्टर कोसळल्याने झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पायलट राजपाल, को-पायलट कप्तल लाल आणि एका स्थानिक नागरिकाचा समावेश आहे. 

राज्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी गेलेले हेलिकॉप्टर परतत असताना उत्तरकाशी जिल्ह्यातील मोरी ते मोल्डी परिसरात दुर्घटनाग्रस्त झाले. विजेच्या तारांमध्ये अडकल्याने ते जमिनीवर कोसळले. उत्तर काशीचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवेंद्र पटवाल यांनी सदर माहिती दिली. 

हेलिकॉप्टर कोसळताना पाहिल्यानंतर परिसरात मदत कार्यासाठी गेलेल्या इंडो-तिबेटियन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत हेलिकॉप्टरमधील तिघांचा मृत्यू झाला होता.  

दक्षिण भारतात पावसाने थैमान घातल्यानंतर आता उत्तर भारतात त्याने आपला मोर्चा वळविला. मुसळधार पाऊस आणि ढगफुटी झाल्यामुळे उत्तराखंड राज्यातही पूरस्थिती निर्माण झाली आहे. आत्तापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला असून उत्तरकाशीमधील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे परिसरात अलर्ट जारी करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three killed in Helicopter crashed accident in Uttarkashi area