Manipur Violence : मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच; गस्तीवरच्या तीन युवकांची हत्या

कुकीबहुल भागात गोळीबार; मृतदेहाची विटंबना, चाकूचे वार
three killed in manipur in renewed violence Kuki community
three killed in manipur in renewed violence Kuki communitysakal
Updated on

इंफाळ : मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच असून कुकीबहुल थोवई गावात आज पहाटे गावाचे संरक्षण करणाऱ्या तीन युवकांची हत्या झाली. त्यांच्या शरीरावर चाकूचे अनेक वार केल्याचे आढळून आले आहे. जामखोगिन (वय २६), थांगखोकाई (वय ३५) आणि हॉलेसन (वय २४) असे मृत युवकांची नावे असल्याचे कुकी समुदायाची संघटना ‘इंडिजिनिअस ट्रायबल लीडर्स फोरम’ने सांगितले.

आज पहाटे पाचच्या सुमारास उखरुल जिल्ह्यातील थोवई गावात प्रचंड गोळीबार झाला. संशयित मैतेई बंडखोर आणि कुकी स्वयंसेवक यांच्यात गोळीबार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या धुमश्‍चक्रीत तीन युवक मारले गेले. यादरम्यान, सीमा सुरक्षा दल व पोलिसांनी गावांची आणि जंगलाची झडती घेतली असता कुकी समुदायातील तीन युवकांचे मृतदेह आढळून आले.

शरीरावर चाकूच्या खुणा दिसल्या. त्यांच्या शरीराचे काही अवयव तोडल्याचे आढळून आले. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मैतेई बंडखोरांनी गावातील चौकीवर हल्ला केला.

त्या ठिकाणी स्वयंसेवक गावाच्या सुरक्षेसाठी कर्तव्यावर होते. मात्र त्यांच्यावर गोळीबार झाला. विशेष म्हणजे या गावापासून मैतेईबहुल भाग बऱ्याच अंतरावर आहे. यियांगपोकी येथे मैतेई नागरिक असून हे ठिकाण देखील घटनास्थळापासून दहा किलोमीटर अंतरावर आहे.

बेकायदा शस्त्र प्रदर्शन

पंधरा ऑगस्टच्या दिवशी चुराचांदपूर येथे बेकायदा शस्त्रप्रदर्शन आयोजित केल्याने खळबळ उडालेली असताना त्याची दखल सरकारने घेतली आहे. त्यामुळे मणिपूर सरकारने या प्रदर्शनाचा अहवाल चुराचांदपूरचे उपायुक्त आणि पोलिस अधीक्षकांकडून मागितला आहे.

राज्याचे संरक्षण सल्लागार कुलदीप सिंह म्हणाले, की, बेकायदापणे शस्त्रांचे प्रदर्शन करणाऱ्या लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. ते म्हणाले, चुराचांदपूर येथे पंधरा ऑगस्ट रोजी परवानगी न घेता एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

त्यात एका गटाने शस्त्राचे प्रदर्शन केले. ते संपूर्णपणे बेकायदा होते. यासंदर्भात अधिकाऱ्यांकडून अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट केले. राज्यात आतापर्यंत १२५० शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. गेल्या तीन महिन्यात हिंसाचाराच्या काळात पोलिसांच्या शस्त्रागारातून मोठ्या प्रमाणात शस्त्रे लुटून नेली आहेत.

नियमित रूपाने झडतीसत्र राबविले जात असून त्यानुसार शस्त्रे जप्त केली जात असल्याचे नमूद केले. दरम्यान, मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह म्हणाले, की परवानगी न घेता शस्त्र प्रदर्शन कसे भरवले, याची चौकशी सरकारकडून केली जात आहे. ते अधिकृत संचलनाचा भाग नव्हते आणि त्यांनी वेगळ्या रीतीने त्याचे आयोजन केले होते, असे ते म्हणाले. दरम्यान, संवेदनशील भागात पाेलिसांचे झडतीसत्र सुरूच आहे.

प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार: बिरेन सिंह

कुकीच्या दहा आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मणिपूरमधील पाच जिल्ह्यासाठी वेगळा सचिव आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी करणारे पत्र लिहिलेले असताना आज मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया दिली. मात्र त्यांनी यावेळी बोलताना कोणत्याच आमदारांचा उल्लेख केला नाही.

ते म्हणाले, मणिपूरमध्ये लवकर शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रयत्नशील आहोत. मात्र काही गैरसमजातून आणि पूर्वग्रहदूषित विचाराने राज्यातील शांतता भंग केली जात आहे. परदेशात रचलेल्या कारस्थानामुळे मणिपूरमध्ये हिंसाचार उसळत आहे. दरम्यान, पंतप्रधानांना लिहलेल्या पत्रात चुराचांदपूर, कांगपोकपी, चंदेल, टेंग्नोपाल आणि फेरजावल या पाच जिल्ह्यांसाठी वेगळा सचिव असावा, अशी मागणी केली असून पंतप्रधान सहायता निधीतून पाचशे कोटी रुपयांची मदत करावी, असेही कुकी आमदारांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com