
कोलकाता : गेल्या महिन्यात मुर्शिदाबाद येथे उसळलेल्या हिंसाचारामध्ये तृणमूल काँग्रेसचा स्थानिक नेता मेहबूब आलम याचा समावेश असल्याचे या हिंसाचाराचा तपास करणाऱ्या कलकत्ता उच्च न्यायालयाच्या तपास अहवालात उघड झाले आहे. ‘वक्फ सुधारणा विधेयकाच्या मंजुरीवेळी हा हिंसाचार घडला होता. विधेयकाच्या मंजुरीदरम्यान झालेले हे हल्ले हिंदू समाजाला लक्ष्य करण्यासाठी केले होते. या वेळी मदतीसाठी याचना करणाऱ्यांनी पोलिसांनी कोणतीही मदत केली नाही. ते ढिम्म राहिले,’ असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या तपास पथकात राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि न्यायिक सेवांतील सदस्यांचा समावेश होता. हा अहवाल आज (ता. २०) उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सादर करण्यात आला.