Toolkit case : दिशा रवीला दिलासा; १ लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

टीम ई-सकाळ
Tuesday, 23 February 2021

टूलकिट गुगल डॉक्युमेंट एडिट करण्याच्या आरोपाखाली कोठडीत असलेली पर्यावरण कार्यकर्ता दिशा रवी हिला अतिरिक्त सत्र न्यायालयानं आज जामीन मंजूर केला.

टूलकिट गुगल डॉक्युमेंट एडिट करण्याच्या आरोपाखाली कोठडीत असलेली पर्यावरण कार्यकर्ता दिशा रवी हिला अतिरिक्त सत्र न्यायालयानं आज जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती धर्मेंद्र राणा यांनी एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तीला जामीन दिला. मात्र, जामीनाच्या प्रक्रियेची पूर्तता झाल्यानंतर संध्याकाळी किंवा उद्या सकाळी तिची तुरुंगातून सुटका होईल. 

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ तयार करण्यात आलेल्या टूलकिट गूगल डॉक्युमेंटच्या चौकशीसाठी दिशा रवी हिनं मंगळवारी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलच्या कार्यालयात हजेरी लावली होती. याठिकाणी निकीता आणि शंतून यांच्या समोर बसून तिची चौकशी करण्यात आली. दिल्लीच्या एका कोर्टाने दिशा रवी हीला सोमवारी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलिसांनी कोर्टात सांगितलं होतं की, दिशाची या प्रकरणातील इतर आरोपी निकित जेकब आणि शांतनू मुलुक यांच्यासमोर चौकशी करायची आहे. 

जेकब आणि मुलुक हे समोवारी चौकशीत सहभागी झाले होते. द्वारका येथे दिल्ली पोलिसांचे सायबर सेलच्या कार्यालयात त्यांची चौकशी पार पडली. पर्यावरण कार्यकर्ते ग्रेटा थनबर्ग यांनी शेअर केलेल्या टूलकिट गूगल डॉक्युमेंटच्या चौकशीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी बंगळूरूची कार्यकर्ता दिशा रवी हीला अटक केली होती. तर जेकब आणि मुलुक यांना कोर्टानं अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. 

पोलिसांनी आरोप केला होता की, कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली भारतात हिंसाचार आणि अशांती पसरवण्याच्या कटाअंतर्गत ही टूलकीट तयार करण्यात आली आहे. हे तीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी पंजाब, हरयाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधून शेतकरी दिल्लीच्या विविध सीमांवर आंदोन करत आहेत. दरम्यान, शांतनू मुलुकने दिल्लीच्या कोर्टात जामीनासाठी अर्ज केला असून यावर २४ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Toolkit case Disha Ravi gets bail on 1 lakhs surety amount