वाहतूक दंड आता विम्याच्या प्रिमियममध्ये

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 September 2019

सध्या वाहतूक नियम तोडल्यास भरावे लागणारे दंड मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : सध्या वाहतूक नियम तोडल्यास भरावे लागणारे दंड मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले आहेत. त्यातच आता हे दंड चुकविल्यास संबधित रक्कम थेट त्या चालकाच्या विम्याच्या प्रिमियममध्ये समाविष्ट केली जाणार असल्याचा नियम देखील बनविण्यात येत आहे.  या योजनेवर सध्या काम करण्यास सुरूवात झाली असून सुरूवातीला ही योजना दिल्लीमध्ये लागू करण्यात येणार आहे. 

वाहतूकीचे दंड वाढविण्यामागे विशेष कारणे आहेत. पूर्वीपासून वाहतुकीसाठी दंड आकारण्यात येत आहेत. यासाठी 1988 मध्ये मोटार वाहन कायदा बनविण्यात आला होता. दरम्यान त्या वेळेसचे 100 रूपये सध्याच्या महागाईत 956 रूपये झाले आहेत. त्यामुळेच त्यावेळी ठरविण्यात आलेल्या दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या व्यक्तींना दंडाची तिप्पट रक्कम भरावी लागू शकते. 

दरम्यान वाढलेले दंड चुकविण्याचा प्रयत्न जर एखाद्या व्यक्तींने केल्यास दंडाची रक्कम ही त्या चालकाच्या विम्याच्या प्रिमियममध्ये समाविष्ट केली जाणार आहे. जेणेकरून, पुढील वेळी विम्याचा प्रमियम भरताना ही रक्कम वसूल केली जाईल. यामुळे पोलिसांना दंडाची रक्कम वसूल करण्यास सोपे जाणार आहे. भारतीय विमा नियामक प्राधिकरणाने या योजनेवर काम करण्यास सुरूवात केली आहे.

अपघातात भारत जगात आघाडीवर

सध्याच्या परिस्थितीला रस्ते अपघातात भारत जगात आघाडीवर आहे. दरम्यान सर्वोत्तम प्रयत्न करूनही अपघातांच्या संख्येत केवळ 3 ते 4 टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच एका सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार भारतात दरवर्षी 5 लाखाहून अधिक रस्ते अपघात होत असतात आणि त्यामध्ये जवळपास दीड लाख लोक मरतात. ही अपघातांची संख्या कमी करण्यासाठीच हे दंड वाढविण्यात आले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transportation penalties now at an insurance premium