खासदार महोदय म्हणतात, 'पत्नीवर गोळी झाडण्यापेक्षा तिहेरी तलाक चांगला'

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 जुलै 2019

पत्नीवर गोळी झाडण्यापेक्षा तोंडी तलाक देऊन नाते संपवणे कधीही चांगले.

- एस. टी. हसन, खासदार, सप.

नवी दिल्ली : पत्नीवर गोळी झाडण्यापेक्षा तोंडी तलाक देऊन नाते संपवणे कधीही चांगले, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे खासदार एस. टी. हसन यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरून नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. 

तिहेरी तलाक विधेयकावर आज लोकसभेत जोरदार चर्चा सुरू आहे. असे असताना हसन यांनी याबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, कोणत्याही धर्माच्या वैयक्तिक बाबीत सरकारने हस्तक्षेप करू नये. कधी-कधी अशी परिस्थिती निर्माण होते, ज्यामध्ये पती-पत्नीने विभक्त होणे हाच एक मार्ग उरतो. मग अशा परिस्थितीत पत्नीवर गोळी झाडण्यापेक्षा तिला तिहेरी तलाक देणेच योग्य ठरते.

याशिवाय फक्त हजरत अबू हनिफा यांना मानणारे लोकच एकावेळी तीन तलाक देतात. आता अबू हनिफांना मानणाऱ्यांसोबत निकाह करावा का हे मुलीच्या कुटुंबीयांवरच सोडणे योग्य ठरेल, असेही हसन यांनी सांगितले.

इस्लामकडून महिलांसोबत न्याय

इस्लामने महिलांसोबत खूप न्याय केला आहे. त्यांची जेव्हा इच्छा होईल तेव्हा त्या पतीपासून खुला घेऊ शकतात. 'मुस्लिम पर्सनल लॉ'मध्ये बदल करणे आणि शरियतमध्ये बदल करणे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Triple Talaq better than firing on wife says S T Hasan