
Turkey Earthquake : भारतासह जगभरातून तुर्कीला मदत
नवी दिल्ली : भूकंपग्रस्त तुर्कीला भारत सरकारने मदतीचा हात पुढे केला असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद कृती दलाच्या (एनडीआरएफ) पथकांसोबतच काही वैद्यकीय पथकेही मदत सामग्री घेऊन पाठविण्यात येणार आहेत.
पंतप्रधान कार्यालयाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधानांचे मुख्य सचिव डॉ. पी.के.मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. ‘एनडीआरएफ’च्या दोन तुकड्यांमध्ये शंभर जवानांचा समावेश असून त्यांच्यासोबत विशेष प्रशिक्षण दिलेले श्वान पथक आणि काही तांत्रिक उपकरणे देखील पाठविण्यात येणार असल्याचे ‘पीएमओ’ने म्हटले आहे.
वैद्यकीय पथकांमध्ये प्रशिक्षित डॉक्टर आणि त्यांच्यासोबत अत्यावश्यक औषधे पाठविण्यात येतील. तुर्कीसरकार, अंकारा येथील भारतीय दूतावास, इस्तंबूल येथील वाणिज्य दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने ही राबविण्यात येत आहे.
जागतिक आरोग्य संघटना (डब्लूएचओ) आणि अन्य आंतरराष्ट्रीय संघटना आणि देशांनीही तुर्कीला मदत देऊ केली आहे. ‘डब्लूएचओ’ची वैद्यकीय पथके तातडीने रवाना झाली. पोलंडने अग्निशामन दलाच्या ७६ जवानांसह आठ प्रशिक्षित श्वानांना पाठविले आहे.
युरोपीय आयोगाने जमिनीवरील पथकांना मदत व्हावी म्हणून उपग्रह मॅपिंग सेवा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेनचे अध्यक्ष व्होल्दोमीर झेलेन्स्की यांनी आम्ही देखील मदत करू असे म्हटले आहे. स्पेन, तैवान आणि इस्राईलने देखील मदतसामग्री पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाची बचाव पथके रवाना होणार आहेत.
शोध आणि बचाव मोहिमेला वेग यावा म्हणून तुर्कीच्या सुरक्षा दलांनी वेगळा एअर कॉरिडॉर तयार केला आहे. यामुळे विविध देशांकडून येणारी मदत थेट दक्षिणेकडील भूकंपग्रस्त भागांमध्ये पोचू शकेल. इराक आणि तुर्कीदरम्यानची तेलवाहिनी सुरक्षित असून त्यातून सुरू असलेला पुरवठा कायम असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आतापर्यंतचे मोठे भूकंप
तुर्कीला आतापर्यंत अनेकदा विध्वंसकारी भूकंपाचा सामना करावा लागला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाल्याचे दिसून येते. मागील २५ वर्षांमध्ये या देशाची भूमी अनेकदा हादरली आहे.
लिराचा भाव पडला
या भूकंपाचे पडसाद रोखे बाजारामध्ये देखील उमटले. तुर्कीयेचे चलन असलेल्या लिरामध्ये मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. डॉलरच्या तुलनेमध्ये लिराने नीचांकी गाठली. या भूकंपामुळे महागाईचा भस्मासूर आणखी भडकू शकतो अशी भीती व्यक्त होत आहे. तुर्कीयेने रशियाकडून आयात करू नये म्हणून अमेरिकेने त्या देशावर निर्बंध घातले असल्याने परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.
आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरून मदत मिळावी म्हणून प्रयत्न करत आहोत. नाटो आणि युरोपीय महासंघाशी संपर्क साधण्यात आला असून आतापर्यंत ४५ देशांकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.
- रेस्सीप तैय्यीप एर्दोगान, अध्यक्ष तुर्की
भूकंपाचे वर्ष - तीव्रता (रिश्चर स्केल) - मृत्यू
ऑगस्ट १९९९ - ७.६ --१७ हजार ५००
नोव्हेंबर १९९९ - ७.२ - ८४५
मे २००३ - ६.४ - १६७
मे २०१० - ६.१ - ४२
ऑक्टोबर २०११ - ७.२- ५.६ - ६४४
जानेवारी २०२० - ६.८ - 22
ऑक्टोबर २०२० - ७.० - २४
फेब्रुवारी २०२३ -७.८ - १३००