ट्विटरने हटवला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा प्रोफाइल फोटो

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 November 2020

मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा प्रोफाइल फोटो हटवला.

नवी दिल्ली - मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा प्रोफाइल फोटो हटवला. अमित शहा यांच्या अधिकृत अकाउंटचा डीपी अचानक हटवण्यात आल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. काही वेळानंतर पुन्हा प्रोफाइल फोटो दिसू लागला. 

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, एखाद्याने कॉपीराइटचा दावा केला असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच प्रोफाइल फोटो हटवला गेला असू शकतो. मात्र आता सोशल मीडियावर यावरून चर्चा रंगली आहे की, देशाच्या गृहमंत्र्यांच्या फोटोवर कोण दावा करू शकतं?

सध्या ट्विटरवर अमित शहांच्या अकाउंटला त्यांचा फोटो दिसत असला तरी गुरुवारी रात्री तो हटवण्यात आला होता. त्याजागी मीडिया नॉट डिस्प्लेड असं दिसत होतं. याबाबत ट्विटरने म्हटलं होतं की, कोणीतरी या फोटोवर कॉपीराइटचा दावा केला होता. ट्विटरने याआधी बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर हँडलचा डीपी हटवला होता. त्यावेळीही कोणीतरी कॉपीराइटचा दावा केला होता.

हे वाचा - ‘लोजप’बाबत भाजपच निर्णय घेईल ; शपथविधी दिवाळीनंतर

देशाचे गृहमंत्री असलेले अमित शहा यांचे ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर असणारे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. त्यांच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहेत. अमित शहांचे 23.6 मिलियन फॉलोअर्स असून ते फक्त 296 लोकांना फॉलो करतात. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twitter removed union minister amit shaha dp copyright issue