भावनगर जिल्ह्यात दलित तरुणाची हत्या

महेश शहा
शनिवार, 31 मार्च 2018

मुलाला घोडा घेऊन दिला नसता, तर ही वेळ आली नसती. 
- कालूभाई राठोड, मृत प्रदीपचे वडील 

अहमदाबाद : गुजरातमध्ये दलितांवरील अत्याचार वाढत असून, घोडेस्वारी केल्याच्या कारणावरून भावनगर जिल्ह्यात एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. दरबार समाजातील लोकांनी त्याची हत्या केली. परवा (शुक्रवार) ही घटना घडली. 

प्रदीप राठोड (वय 21) असे या तरुणाचे नाव असून, तो भावनगर जिल्ह्याच्या उमराळा तालुक्‍यातील टिम्व्ही या गावचा रहिवासी होता. बेदम मारहाण करून त्याला ठार करण्यात आले. तो घोडेस्वारी करत असल्याचा काहींना राग होता. त्याबद्दल त्याला धमक्‍याही दिल्या जात होत्या. मात्र, तिकडे दुर्लक्ष करून प्रदीपने घोडेस्वारी सुरूच ठेवली होती. शुक्रवारी तो घोड्यावर बसून शेतात गेला होता. पण घोडा त्याच्याविनाच परत आल्यामुळे घरच्यांना संशय येऊन त्यांनी शोध घेतला, तेव्हा प्रदीप शेताजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याचे डोके चेचण्यात आले होते, अशी माहिती प्रदीपचे वडील कालूभाई राठोड यांनी दिली. 

त्यांनी उमराळा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली असून, भावनगरच्या अनुसूचित जाती, जमाती विभागाचे पोलिस उपाधीक्षक ए. एम. सैयद चौकशी करीत आहेत. प्रदीपच्या हत्येसंदर्भात पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत कालूभाईंनी पिपराल गावातील घुघाभाई गोहिल (वय 35), जितूभा गोहिल (वय 33) या दोघा भावांविरुद्ध आणि टिम्व्ही गावातील नतुभा झाला (वय 70) यांची नावे घेतली आहेत. टिंबली हे पाच हजार लोकवस्तीचे गाव असून, तेथे 250 पेक्षा जास्त दलित कुटुंबे राहतात. 

Web Title: two brothers have been killed in bhavnagar Area