Hijab Row : हिजाब वाद पुन्हा उफाळला; भगव्या स्कार्फवरून शाळेत दोन गटांत हाणामारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

West Bengal Howrah

तणाव निवळण्यासाठी पोलीस आणि शीघ्र कृती दलाच्या जवानांना तैनात करावं लागलं.

Hijab Row : हिजाब वाद पुन्हा उफाळला; भगव्या स्कार्फवरून शाळेत दोन गटांत हाणामारी

पश्चिम बंगालच्या हावडा (West Bengal Howrah) येथील एका शाळेत मंगळवारी विद्यार्थ्यांच्या दोन गटांत तुफान हाणामारी झाली. एक गट 'नमाबली' (भगवा स्कार्फ) घालून वर्गात जाण्याची परवानगी मागत होता. जर मुलींना हिजाब (Hijab) घालून वर्गात प्रवेश मिळू शकतो, तर आम्हाला नमाबली घालून का नाही? असा सवाल त्यांनी केला.

यावेळी दोन गटांत तुफान हाणामारी झाली. यानंतर तणाव निवळण्यासाठी पोलीस आणि शीघ्र कृती दलाच्या जवानांना तैनात करावं लागलं. दोन्ही बाजूंच्या मुला-मुलींमध्ये जोरदार भांडण झालं. त्यामुळं अधिकाऱ्यांना बोर्डाच्या पूर्व परीक्षा रद्द कराव्या लागल्या. पश्चिम बंगाल बोर्डाशी (West Bengal Examination Board) सलग्न असलेल्या धुलागोरी आदर्श विद्यालय (Dhulagori Adarsha Vidyalaya) या 50 वर्षांच्या शाळेनं शांतता सुनिश्चित करण्यासाठी व्यवस्थापन समिती, पालक आणि स्थानिक प्रशासनासोबत बैठक बोलावलीय.

हेही वाचा: Crime News : नात्याला काळिमा! एकाच कुटुंबातील वडील, 2 बहिणींसह आजीची मुलानं केली चाकूनं भोसकून हत्या

दरम्यान, शाळेच्या गणवेशावर ‘नमाबली’ (भगवा स्कार्फ) घातलेले पाच विद्यार्थी शाळेच्या गेटजवळ आले आणि त्यांनी काही विद्यार्थ्यांना हाणामारी करण्यास सुरू केली. नमाबली घातलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. शाळा अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी 'नमाबली'सह आत प्रवेश देण्याची मागणी केली. शाळेत मुलींना हिजाब घालण्याची परवानगी आहे, मग आम्हाला नमाबली घालण्याची परवानगी का नाही? असा सवाल त्यांनी केला.

हेही वाचा: Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

शिक्षकांना विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवता आलं नाही. शाळेच्या आवारातच दोन गटांत हाणामारी होऊन शाळेच्या मालमत्तेचं नुकसान झाल्याचं काही शिक्षकांनी सांगितलं. क्लास इन्चार्ज अरिंदम बॅनर्जी यांनी तात्काळ संकरेल पोलिसांना पाचारण केलं. आरएएफसह एक पथक शाळेत पोहोचलं आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. हावडा पोलीस आयुक्त प्रवीण त्रिपाठी यांनी सध्या या संपूर्ण प्रकरणावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. दरम्यान, आज (बुधवार) होणारी आणखी एक परीक्षा आता अनिश्चित काळासाठी पुढं ढकलण्यात आली आहे.