'बिगबास्केट' वर हॅकरचा डल्ला; चूक झाल्याची कंपनीची कबुली

वृत्तसंस्था
Tuesday, 10 November 2020

डेटाबेसचा एक भाग लिक झाला एसक्यूएल फाईलचा साईज १५ जीबी आहे, ज्यात वैयक्तिक माहितीशिवाय लॉगीन करणाऱ्याचा आयपी अॅड्रेसही आहे. सायबल ही अमेरिकी कंपनी आहे.

नवी दिल्ली - तब्बल दोन कोटी युजरचा संवेदनशील डेटा बीगबास्केट या ऑनलाईन ग्रोसरी स्टोअरकडून लीक झाला. हे चुकून घडल्याची कबुली या कंपनीने दिली. त्यातच एका हॅकरने हा डेटा ३० लाख रुपयांना विक्रीस ठेवल्याचेही धक्कादायक वृत्त आले. 

पूर्ण नाव, इमेल आयडी, पासवर्ड हॅशेज, संपर्क क्रमांक, पत्ता तसेच आणखी माहिती लीक झाल्याचे व ती ४० हजार डॉलर इतक्या किंमतीला विक्रीस उपलब्ध असल्याचे सायबल कंपनीच्या संशोधन चमूला आढळून आले. डेटाबेसचा एक भाग लिक झाला एसक्यूएल फाईलचा साईज १५ जीबी आहे, ज्यात वैयक्तिक माहितीशिवाय लॉगीन करणाऱ्याचा आयपी अॅड्रेसही आहे. सायबल ही अमेरिकी कंपनी आहे. ३१ ऑक्टोबर रोजी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीगबास्केटला तशी कल्पना देण्यात आली. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पोलिसांत गुन्हा 
दरम्यान, अशी चोरी झाल्याप्रकरणी हॅकर्सविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. आर्थिक संदर्भातील माहिती सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला. 

कार्डचा तपशील नाही 
ग्राहकांची वैयक्तिक व गोपनीय माहिती सुरक्षित राखण्यास कंपनीचे सर्वोच्च प्राधान्य असून डेबिड किंवा क्रेडीच कार्डचा तपशील लिक झाला नसल्याचा दावाही करण्यात आला. हा तपशील स्टोअर केला जात नाही असेही सांगण्यात आले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लॉकडाउनमुळे प्राधान्य 
कोरोनाच्या जागतिक साथीमुळे देशात बहुतांश ठिकाणी लॉकडाउन लागू झाले. या कालावधीत ऑनलाइन माध्यमाला प्राधान्य देण्यात आले. त्यात किराणा माल आणि भाजी खरेदीसाठी अधिकाधिक ग्राहकांनी बीगबास्केटला पसंती दिली. घरपोच वस्तु मिळत असतानाच ॲपमध्ये सुरक्षेशी तडजोड झाल्यामुळे वैयक्तिक माहितीचा फटका बसल्याची मात्र अनेकांना कल्पना नव्हती. 

डेटाचोरीची कारणे 
मालवेअर वापरून हल्ला 
तांत्रिक यंत्रणेतील चुका 
मानवी चुका 

१४ कोटी - डेटाचोरीची सरासरी किंमत 
९.४ टक्के - गत वर्षाच्या तुलनेतील वाढ 
८३ दिवस - डेटाचोरी रोखण्यासाठी लागलेला सरासरी काळ 
७७ - यासाठीचा गेल्या वर्षातील कालावधी 

आधीची घटना 
गेल्याच महिन्यात हैदराबादमधील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजला सर्व्हरमधील डेटाचोरीमुळे आपले सर्व कारखाने बंद ठेवावे लागले होते. स्पुटनीक व्ही या कोरोनावरील रशियन लशीच्या चाचण्यांची परवानगी मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा प्रकार घडला होता. तेव्हा भारतासह रशिया, अमेरिका, ब्रिटन व ब्राझील येथील कारखाने बंद ठेवावे लागले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two million user data was leaked online big basket Grocery Store