73 वर्षांनी भेटले दोन जुने मित्र; भारत-पाक फाळणीत झाले होते वेगळे | Kartarpur Corridor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

two old friends from india and pakistan reunite in kartarpur gurdwara darbar sahib

73 वर्षांनी भेटले दोन जुने मित्र; भारत-पाक फाळणीत झाले होते वेगळे

भारतीय सीमेपासून अवघ्या तीन किलोमिटर अंतरावर असलेले कर्तारपूर शिख बांधवांसाठी अत्यंत महत्वाचे धार्मिक स्थळ आहे. सध्या हा करतारपूर कॉरिडॉर उघडल्यानंतर शीख समुदायाचे लोक पाकिस्तानमधील या गुरुद्वाराला कोणत्याही अडथळ्याशिवाय भेट देऊ शकणार आहेत. दरम्यान नुकतेच करतारपूर कॉरिडॉर उघडल्यामुळे भारत-पाकीस्तान फाळणीपासून वेगळे झालेल्या दोन मित्रांची भेट झाली आहे.

भारताचे सरदार गोपाल सिंग 1947 मध्ये त्यांचे बालपणीचे मित्र मोहम्मद बशीर यांच्यापासून वेगळे झाले होते. आज इतक्या वर्षांनंतर एकमेकांना पाहून त्यांचे डोळे भरून आले आणि त्यांनी एकमेकांना मिठी मारली. सध्या सरदार गोपाल सिंग यांचे वय 94 वर्षे आहे तर मोहम्मद बशीर हे 91 वर्षे वयाचे आहेत.

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, सरदार गोपाल सिंह करतारपूर कॉरिडॉर उघडल्यानंतर गुरुद्वारा दरबार साहिबला भेट देण्यासाठी पाकिस्तानात आले होते. दरम्यान पाकिस्तानातील नरोवाल येथे राहणारे मोहम्मद बशीरही गुरुद्वारात पोहोचले आणि या दोन जुन्या मित्रांनी एकमेकांना पाहिले थोडी विचारपूस केली आणि दोघांनी एकमेकांना ओळखलं. हा प्रसंग इतका भावनिक होता की, या ठिकाणी उपस्थित असलेल्या भारतीय यात्रेकरू आणि पाकिस्तानी नागरिकांचे डोळे देखील भरून आले. फाळणीच्या वेळी विभक्त झालेल्या या दोन मित्रांच्या भेटीबद्दलही सर्वांनी आनंद व्यक्त केला.

भारत, पाकिस्तान तसेच जगातील वेगवेगळ्या देशांतून आलेल्या यात्रेकरूंनी या दोन मित्रांचे अभिनंदन केले. मग या जुन्या मित्रांनी त्यांच्या बालपणीच्या आणि तरुणपाणाचे किस्सेही सांगितले.

गोपाल सिंग यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या निर्मितीवेळी दोघेही तरुण होते. बशीर यांनी सांगितले की, फाळणीपूर्वीही दोन्ही मित्र गुरुद्वाराला एकत्र जायचे. यानंतर दोन मित्रांनी एकत्र जेवण केले आणि चहा देखील घेतला. गोपाल सिंह यांनी कर्तारपूर कॉरिडॉर खुला झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि यासाठी दोन्ही देशांच्या सरकारांचे आभार मानले आणि संध्याकाळी पाच वाजता गोपाल सिंग हे भारतात परत आले.

loading image
go to top