बिहारमध्ये दोन वैज्ञानिकांना संतप्त जमावाची मारहाण

सकाळ न्यूज नेटवर्क 
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

मुलांच्या अपहरणाच्या अफवांनी बिहारमध्ये धुमाकूळ घातला असून, त्याचा फटका मणिपूर आणि कोलकत्याहून आलेल्या दोन वैज्ञानिकांना बसला. संतप्त जमावाने या दोघांना मारहाण केली तसेच त्यांच्या वाहनाचे नुकसान केले. जमावाच्या तावडीतून कसाबसा पळ काढत या दोन्ही वैज्ञानिकांनी जीव वाचविला. 

पाटणा : मुलांच्या अपहरणाच्या अफवांनी बिहारमध्ये धुमाकूळ घातला असून, त्याचा फटका मणिपूर आणि कोलकत्याहून आलेल्या दोन वैज्ञानिकांना बसला. संतप्त जमावाने या दोघांना मारहाण केली तसेच त्यांच्या वाहनाचे नुकसान केले. जमावाच्या तावडीतून कसाबसा पळ काढत या दोन्ही वैज्ञानिकांनी जीव वाचविला. 

या संदर्भात नौहट्टा पोलिस ठाण्यात एका वैज्ञानिकाच्या तक्रारीवरून शंभर अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मणिपूरचे भू-वैज्ञानिक रोज एल. रोतांग छवी आणि कोलकत्याच्या "जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया'तील मनीष कुमार हे दोन वैज्ञानिक जमावाच्या संतापाचे शिकार ठरले. हे दोघे काही कामगारांसमवेत चफला या गावात भूसर्वेक्षण करत होते. पाऊस सुरू झाल्यामुळे हे सगळे एका झाडाखाली थांबले होते. बाजूलाच त्यांचे वाहन होते. तेथेच काही मुले बकऱ्यांना चरण्यासाठी घेऊन आली होती.

या वैज्ञानिकांनी मुलांना सहज म्हणून केळी आणि सफरचंदे खाण्यास दिली. मात्र, त्याचा परिणाम भलताच झाला. एक मुलगा गावात पळाला. तो काय म्हणतोय हे न समजल्याने गावकऱ्यांनी हे वैज्ञानिक मुलांना पळविणारे असल्याचे समजून त्यांना मारहाण सुरू केली. त्यांच्या वाहनाचेही नुकसान केले. मात्र, काही गावकऱ्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे छवी आणि मनीष कुमार यांचा जीव वाचला आणि त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.

छवी यांच्या तक्रारीनंतर शंभर अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस ठाणेदार 
कृपाशंकर साह यांनी दिली. या भागात गेली दोन वर्षे खनिज संपत्तीसंदर्भात संशोधन सुरू आहे; मात्र वैज्ञानिकांनी या संदर्भात स्थानिक अधिकाऱ्यांना काही माहिती दिली नसल्याचे कळते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Scientists beaten by Mob in Bihar