
CJI उदय लळित यांनी घेतली भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ
जस्टीस उदय उमेश लळीत यांनी भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. एन. व्ही. रमणा यांच्या सरन्यायाधीशपदाचा कार्यकाळ २६ ऑगस्ट रोजी संपला आहे. त्यानंतर रमणा यांनी लळीत हे आपले उत्तराधिकारी झाले आहेत. न्यायमूर्ती उदय उमेश लळीत म्हणजेच यू. यू. लळीत सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाले. लळीत यांच्या नियुक्तीने कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
नवे सरन्यायाधीश न्या. उदय लळीत यांचा कार्यकाळ तीन महिन्यांपेक्षाही कमी असणार आहे. उदय लळीत 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत.
कोणत्याही हायकोर्टाचे न्यायाधीश नसतानाही उदय लळीत हे देशाचे सरन्यायाधीश झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील ही दुसरी घटना आहे. या अगोदर 1971 मध्ये देशाचे 13 वे सरन्यायाधीश एस.एम. सिकरी यांना सरन्यायाधीश होण्याची संधी मिळाली होती.
विजयदुर्गजवळ असलेले गिर्ये हे न्यायाधीश उदय लळीत यांचे मूळ गाव आहे. आजही आठ ते दहा लळीत कुटुंब या गावात वास्तव्य करत आहेत. सुमारे 200 वर्षांपूर्वी काही लळीत कुटुंबाचे काही कारणाने कुंभवडे, पेंढरी, हरचेली चुना कोळवण तसेच रायगड जिल्ह्यातील रोहाजवळ आपटे या गावी स्थलांतर झाले होते. लळीतांच्या घराण्यात वकिली पिढीजात चालत आलेली आहे.
उदय लळीत यांचे वडील अॅड. उमेश लळीत हेही मुंबई उच्च न्यायालयाने नामनिर्देशित केलेले ज्येष्ठ वकील होते. ते 1974 ते 76 या काळात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे माजी अतिरिक्त न्यायाधीश होते. या पार्श्वभूमीवर मुंबईत त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. जून 1983 मध्ये न्यायाधीश उदय लळीत यांनी वकिलीला सुरुवात केली. उदय लळीत यांनी दिवंगत ज्येष्ठ वकील एम. ए. राणे यांच्याकडे सुरुवातीची काही वर्ष वकिली केली. नंतर ते दिल्लीत गेले.
तब्बल सहा वर्षे त्यांनी ज्येष्ठ विधीतज्ज्ञ सोली सोराबजी यांचे निकटचे सहकारी म्हणून काम केले. अनेक वर्ष लळीत सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली करत आहेत. न्यायाधिश लळीत यांचे आजोबा, चार काका आणि त्यांचे वडील सर्वजण वकिलीच करायचे. उदय लळीत यांचे आजोबा वकिली करण्यासाठी आपटे येथून सोलापूर येथे जाऊन स्थायिक झाले होते.
दरम्यान, माजी केंद्रीय दळणवळण मंत्री ए राजा यांच्यासह अनेक बड्या असामी आरोपी असलेला 2G स्पेक्ट्रम घोटाळा खटला दिल्लीच्या विशेष न्यायालयात सुरु झाला. त्यावेळी केंद्रीय गुप्तचर विभाग (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या दोन तपास यंत्रणाच्या वतीने अभियोग चालवण्याची जबाबदारी, केंद्र सरकारने घेतलेले आक्षेप जुगारुन सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या विश्वासाने जेष्ठ वकील उदय लळीत यांच्यावर टाकली. अशा अनेक केसेसमध्ये त्यांनी नैपुण्यपूर्ण काम केले.
विशेष पब्लिक प्रोसिक्युटर म्हणून नेमणूक मितभाषी, निर्गवी आणि सदा हसतमुख असणारे उदय लळीत हे गेल्या काही वर्षात सर्वोच्च न्यायालयात हाय प्रोफाईल प्रकरणे चालूनही प्रसिद्धीपासून पूर्णपणे अलिप्त राहिले आहेत. 80 हजार पानांच्या कागदपत्रांचा डोंगर सांभाळत त्यांनी '2G स्पेक्ट्रम' हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा भ्रष्टाचार खटला चालवला होता.