धान्यनिर्यात थांबल्याने समस्यांत वाढ : भारताकडून चिंता व्यक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ukraine grain exports stop Food fuel and fertilizer shortages

धान्यनिर्यात थांबल्याने समस्यांत वाढ : भारताकडून चिंता व्यक्त

न्यूयॉर्क : युक्रेनमधील धान्याची काळ्या समुद्रामार्गे होणारी निर्यात थांबल्याने अन्न, इंधन आणि खते टंचाई या समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त करत भारताने चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे युक्रेनमधून होणारी अन्नधान्याची निर्यात पुन्हा सुरु करावी, असे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रांच्या एका सत्रात केले.

रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर रशियाने काळा समुद्र आणि अझोव्हच्या समुद्रात लढाऊ जहाजे तैनात केल्याने युक्रेनमधून युरोप आणि आफ्रिका खंडाला होणारी धान्याची निर्यात थांबली. यामुळे आफ्रिकेमध्ये प्रचंड अन्नटंचाई निर्माण झाली. अखेर संयुक्त राष्ट्रांनी मध्यस्थी करत धान्य निर्यातीबाबत रशियाबरोबर करार केल्यानंतर ही निर्यात सुरु झाली.

१९ नोव्हेंबरपर्यंत कराराची मुदत असताना, युक्रेनने जहाजांवर ड्रोन हल्ले केल्याचे कारण सांगत रशियाने या कराराची अंमलबजावणी थांबवत निर्यात बंद केली आहे. या परिस्थितीवर भारताने चिंता व्यक्त केली आहे. ‘धान्य निर्यात सुरु झाल्यामुळे युक्रेनमधील शांततेसाठी आशा निर्माण झाली होती. मात्र, त्यात अडथळा निर्माण झाल्याने अन्न, इंधन आणि खत टंचाईचा प्रश्‍न पुन्हा आ वासून उभा राहू शकतो. त्यामुळे निर्यात कराराची पुन्हा अंमलबजावणी करून त्याचा कालावधीही वाढवावा,’ असे आवाहन भारताचे वाणिज्यदूत आर. मधुसूदन यांनी केले.

कॉरिडॉरचा गैरवापर : रशिया

धान्यनिर्यातीसाठी सुरु केलेल्या सागरी कॉरिडॉरचा वापर युक्रेनकडून लष्करी कारणांसाठी आणि आमच्यावर हल्ले करण्यासाठी होऊ लागल्याने, धान्य निर्यात करार स्थगित केला, असा दावा रशियाचे केला.