
Uma Bharti : राम भक्ती भाजपचे कॉपीराइट नाही; उमा भारती
छिंदवाडा, मध्य प्रदेश : लोधी समाजाच्या लोकांनी भाजपलाच मतदान करणे बंधनकारक नाही अशा आशयाच्या विधानानंतर ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले. राम आणि हनुमानाची भक्ती ही काही भाजपचे कॉपीराइट नाही, असे त्या म्हणाल्या.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी हनुमान मंदिर बांधले आहे. याविषयी प्रश्न विचारला असता उमा भारती यांनी ही प्रतिक्रिया दिली.
उमा भारती मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आहेत. त्या लोधी समाजाच्या आहेत. लोधी समाजाच्या लोकांनी स्वतचे हित पाहून मतदान करावे, असे विधान त्यांनी अलिकडेच केले होते.
राज्यात त्यांच्याच भाजपचे सरकार आहे, पण दारूबंदीच्या मागणीवरून त्या शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील सरकारची कोंडी करीत आहेत. अलीकडेच त्यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशातील मद्य दुकानांवर दगडफेक करण्यात आली होती. भाजपकडून दुर्लक्षित झाल्यामुळे त्या दुखावल्या गेल्याचे मानले जात आहे.
‘पठाण'' चित्रपटाच्या वादाबाबत त्यांनी परखड मत व्यक्त केले. भाजप सरकारच्या सेन्सॉर बोर्डाने आक्षेपार्ह दृश्ये तातडीने हटवावीत. यावरून राजकारण करण्याची गरज नाही. कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जातील अशा दृश्यांना कात्री लावावी. कोणत्याही रंगाचा अवमान भारत सहन करणार नाही. भगवा रंग हिंदू संस्कृतीची ओळख आहे, असे त्या म्हणाल्या.
खुर्शिद यांच्यावर टीका
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांनी राहुल गांधी यांची तुलना श्रीरामाशी केली होती. त्यावरून टीका करताना उमा भारती म्हणाल्या की, ‘विश्वाचे प्रभू असलेल्या रामाची तुलना करणे चुकीचे आहे. असे करून ही मंडळी स्वतःचेच हसे करून घेत आहेत.‘
‘खुर्शिद यांना बहुतेक मोहेंजोदडो येथील पुरातन स्थळातून उत्खनन करून बाहेर काढण्यात आले असावे असे वाटले,‘ अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. भारतात कोणत्याही जोडो यात्रेची गरज नाही. काँग्रेसमधील फूट आणखी स्पष्ट दिसत आहे, असा टोला त्यांनी लगावला.
प्रज्ञा ठाकूरना पाठिंबा
भाजपच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांना वादग्रस्त वक्तव्याबाबत उमा भारती यांनी पाठिंबा दर्शविला. छिंदवाडा येथील कार्यक्रमात प्रज्ञा म्हणाल्या होत्या की, हिंदूंनी घरात शस्त्र ठेवावे.
शस्त्र बाळगणे चुकीचे नाही, तर हिंसक विचार योग्य नाहीत. प्रभू रामचंद्रानेही वनवासात असताना शस्त्रांचा त्याग न करण्याचा प्रतिज्ञा केली होती.