
West Bengal Metro : प. बंगालमध्ये मेट्रोसाठी पाण्याखालचा बोगदा
हावडा- कोलकता : पश्चिम बंगालमध्ये मेट्रोसेवेसाठी देशातील पहिला पाण्याखालचा बोगदा उभारला जात असून पूर्व आणि पश्चिम मेट्रो कॉरिडॉरचा अविभाज्य घटक असणाऱ्या या बोगद्याच्या उभारणीवर तब्बल १२० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
या बोगद्याची लांबी ५२० मीटर एवढी असेल तो पार करण्यासाठी ४५ मिनिटांचा अवधी लागेल. डोळ्याची पापणी लवती ना लवती तोच रेल्वेगाडी भरधाव वेगाने या बोगद्यातून पुढे जाईल. युरोस्टार कंपनीच्या लंडन- पॅरिस कॉरिडॉरच्या धर्तीवर
या बोगद्याची उभारणी केली जात असून तो प्रत्यक्ष नदीतळापासून १३ मीटर खोलीवर खोदण्यात येईल. प्रत्यक्ष जमिनीपासून तो ३३ मीटर खोलीवर असेल अशी माहिती सूत्रांनी दिली.
पूर्व आणि पश्चिम मेट्रो कॉरिडॉरचा हा बोगदा एक प्रकारे भूषण असेल पूर्वेकडील सॉल्ट लेक सेक्टर पाचमधील आयटी हब आणि पश्चिमेला लागून असलेले हावडा मैदान या बोगद्याच्या माध्यमातून जोडल्या जाईल.
सध्या या बोगद्याच्या उभारणीची प्रक्रिया बऱ्याचअंशी पूर्ण झाली असून डिसेंबर २०२३ पासून तो प्रवाशांच्या सेवेत असेल. इस्पलांदे आणि सीलदाहदरम्यानच्या अडीच किलोमीटरच्या भागाची उभारणी पूर्ण झाल्यानंतर या बोगद्याचे काम देखील पूर्ण होईल.
पूर्व- पश्चिम कॉरिडॉर या बोगद्याशिवाय पूर्णच होणार नाही. या भागातील निवासी परिसरांना जोडण्यासाठी हा कॉरिडॉर महत्त्वाचा ठरेल असे कोलकता मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे मुख्य व्यवस्थापक शैलेशकुमार यांनी सांगितले.
प्रकल्पाचे असेही महत्त्व
सध्या हावडा ते सीलदाहदरम्यान रस्त्याने प्रवास करण्यासाठी दीड तासांचा वेळ लागतो पण आता या बोगद्यामुळे हाच प्रवास ४० मिनिटांमध्ये पूर्ण होऊ शकेल. यामुळे वाहतूक कोंडीची समस्यादेखील मार्गी लागू शकेल.
पूर्व- पश्चिम कॉरिडॉरच्या उभारणीला आतापर्यंत बराच विलंब झाला होता आणि त्यामुळे या प्रकल्पाची किंमत देखील वाढली होती. या सगळ्या प्रकल्पाला २००९ मध्ये मान्यता देण्यात आली तेव्हा त्याची किंमत ४ हजार ८७५ कोटी रुपये एवढी होती. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ऑगस्ट २०१५ ची डेडलाईन निश्चित करण्यात आली होती.
आता याच प्रकल्पाची किंमत ८ हजार ४७५ कोटी रुपयांवर गेली असून त्यातील ८ हजार ३८३ कोटी रुपये याआधीच खर्च करण्यात आले आहेत.या बोगद्यांच्या उभारणीसाठी दोन जर्मन बनावटीच्या बोअरिंग मशिनची मदत घेण्यात आली असून प्रेरणा आणि रचना अशी त्यांची नावे आहेत.