आगामी तिमाहीत बेरोजगारीत भर !

वृत्तसंस्था
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

आगामी तिमाहीत बेरोजगारीच्या समस्येत आणखी भर पडण्याची शक्‍यता आहे. केवळ 19 टक्के कंपन्यांनीच मनुष्यबळात वाढ करण्याची योजना असून, तब्बल 52 टक्के कंपन्या यात कोणताही बदल करणार नसल्याचे एका पाहणीत समोर आले आहे.

मनुष्यबळ वाढीबाबत 19 टक्के कंपन्याच आशावादी
नवी दिल्ली - आगामी तिमाहीत बेरोजगारीच्या समस्येत आणखी भर पडण्याची शक्‍यता आहे. केवळ 19 टक्के कंपन्यांनीच मनुष्यबळात वाढ करण्याची योजना असून, तब्बल 52 टक्के कंपन्या यात कोणताही बदल करणार नसल्याचे एका पाहणीत समोर आले आहे.

मॅनपॉवर ग्रुपने आपला "एम्प्लॉयमेंट आऊटलूक' हा पाहणी अहवाल मंगळवारी प्रसिद्ध केला. त्यानुसार, केवळ 19 टक्के कंपन्याच नव्याने नोकऱ्या उपलब्ध करून देण्याबाबत आशावादी आहेत. तिथेच 52 टक्के कंपन्यांनी याची शक्‍यता फेटाळली असून, 28 टक्के कंपन्यांनी साशंकता दर्शवल्याचे अहवालात नमूद आहे.

मॅनपॉवर ग्रुपने 44 देशांतील सुमारे 59 हजार कंपन्यांच्या मनुष्यबळ वाढीसंदर्भातील योजना जाणून घेतल्या. यात भारतातील 5131 कंपन्यांचा समावेश आहे.

तरीही भारत जगात चौथा
मंदीमुळे विविध क्षेत्रातील कंपन्यांनी नोकरकपातीचा मार्ग अवलंबला असून, लाखो जणांना याचा फटका बसला आहे. मात्र, अशा स्थितीतही आगामी तिमाहीतील रोजगारनिर्मितीबाबत भारत जगात चौथ्या क्रमांकावर राहील, असे अहवालात म्हटले आहे. जपान, तैवान व अमेरिका यात आघाडीवर असून, या देशांतील अनुक्रमे 26,21 आणि 20 टक्के कंपन्यांनी मनुष्यबळ वाढविण्याचे संकेत दिले आहेत.

या क्षेत्रांत इतक्‍या संधी
- शैक्षणिक - 27%
- व्यापार - 25 %
- सेवा - 22 %
- उत्पादन - 16 %
- बांधकाम - 13 %
- वाहतूक - 11 %


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unemployment Increase in next three month