देशभरात बेरोजगारी डोंगराएवढी; केंद्राकडे मात्र एवढी पदे रिक्त 

टीम ई-सकाळ
Thursday, 23 January 2020

केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या विभागातील जवळपास सात लाख पदे रिक्त आहे. या पदांच्या भरतीसाठी केंद्र सरकारने आग्रह धरला आहे.

नवी दिल्ली New Delhi : देशभरात बेरोजगारीची समस्या डोंगराएवढी झाली आहे. ग्रामीण भागातूनही बेरोजगार तरुण महानगरांच्या दिशेनं येत आहेत. यावरून केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणवर टीका होत असतानाच केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारी लाखो पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या संदर्भात एबीपी या वृत्त समूहाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या विभागातील जवळपास सात लाख पदे रिक्त आहे. या पदांच्या भरतीसाठी केंद्र सरकारने आग्रह धरला आहे. या रिक्त असलेल्या पदांमध्ये तिसऱ्या श्रेणीत 5 लाख 75 हजार, दुसऱ्या श्रेणीत 90 तर पहिल्या श्रेणीतील 20 हजार पदे रिक्त आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्राने ही सगळी पदे टप्प्या टप्प्याने भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी मोठी भरती मोहीम राबवण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागानं या संदर्भात वेगवेगळ्या विभागांना 21 जानेवारी रोजी पत्र लिहिले आहे. त्या पत्रात ही पदे तातडीने भरण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आणखी वाचा - अमित ठाकरेंची राजकारणात एन्ट्री

26 हजार तरुणांची आत्महत्या
एबीपीने दिलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या वर्षी 26 हजार 085 बेरोजगार तरुणांनी आत्महत्या केली. त्यात सरासरी रोज 35 नोकरी न मिळालेले तरुण आत्महत्या करत होते. तर, रोज सरासरी 36 जण स्टार्टअपशी निगडीत तरुण आत्महत्या करत होते. नोकरी गमावलेल्या किंवा नसलेल्या 12 हजार 936 तरुणांनी तर, स्वयंरोजगाराशी निगडीत 13 हजार 149 तरुणांनी आत्महत्या केली आहे. देशात फेब्रुवारी 2019मध्ये बेरोजगारी निर्देशांक 6.83 टक्के होता. ऑक्टोबर 2019पर्यंत हा निर्देशांक 8.1 टक्के होता. शहरात बेरोजगारीचे प्रमाण तुलनेत जास्त आहे. शहरात 8.5 टक्के तर ग्रामीण भागात 7.9 टक्के बेरोजगारी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unemployment in india 7 lakh positions are vacant in central government