सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट! बोनससाठी केंद्राची 3 हजार 737 कोटी रुपयांना मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 October 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकार 30 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीला बोनस भेट देणार आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकार 30 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीला बोन भेट देणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. 

डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले जातील. दसरा किंवा दुर्गा पूजेच्या आधी 30 लाख केंद्रिय कर्मचाऱ्यांना 3 हजार 737 कोटी रुपयांचा बोनस देण्यास सुरुवात केली जाईल अशी माहिती जावडेकर यांनी दिली. 

आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये प्रोडक्टिव्हीटी लिंक्ड बोनसला केंद्रिय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाने 30 लाखांहून अधिक अराजपत्रित कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. यामुळे सरकारच्या तिजेरीवर 3 हजार 737 कोटी रुपयांचा भार पडणार आहे असं जावडेकर म्हणाले. 

गेल्या आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी स्पेशल फेस्टिव्हल अॅडव्हान्स योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. यामाध्यमातून कर्मचाऱ्यांना अॅडव्हान्समध्ये 10 हजार रुपये घेता येणार आहेत. हे पैसे कर्मचाऱ्यांना दहा महिन्यात परतफेड करता येणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Cabinet approves Bonus for 2019-2020 More than 30 lakh non-gazetted employees