तिच्या किंकाळ्या अखेर थांबल्या; उन्नाव बलात्कार पीडितेचा मृत्यू

वृत्तसंस्था
शनिवार, 7 डिसेंबर 2019

...तरीही ती एक किलोमीटर चालली 
नराधमांनी पीडित तरुणीला पेटवून दिल्यानंतर ती नव्वद टक्के भाजली. यानंतरदेखील ती एक किलोमीटर चालली आणि रस्त्याच्या शेजारीच असलेल्या एका घराबाहेरील व्यक्तीकडे तिने मदत मागितली. यानंतर तिने स्वत: 112 क्रमांकावर दूरध्वनी केला आणि पोलिसांना आपबिती सांगितली. यानंतर पोलिस आणि रुग्णवाहिकेने घटनास्थळी धाव घेत तिला रुग्णालयात दाखल केले होते.

उन्नाव (यूपी) : उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेवर गुरुवारी सकाळी न्यायालयाकडे जात असताना नराधमांनी हल्ला करत तिला पेटवून दिले होते. अखेर आज (शनिवार) सुमारे 40 तासांनी तिच्या किंकाळ्या शांत झाल्या असून, तिचा मृत्यूशी लढा अपयशी ठरला आहे. 

गुरुवारी तिला पेटवून दिल्यानंतर लखनौहून तिला एअर ऍम्ब्युलन्सने दिल्लीला उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र, 90 टक्के ती भाजली असल्याने अखेर तिचा मृत्यू झाला आहे. उन्नाव येथील बलात्कार पीडितेचा शुक्रवारी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. बलात्कार पीडित महिलेला गुरुवारी पहाटे आरोपींनी जाळण्याचा प्रयत्न केला होता, त्यात ती 90 टक्क्य़ांहून अधिक भाजल्यानंतर तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री 11.40 च्या सुमारास सफदरजंग रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. कार्डिऍक अरेस्टमुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. यापूर्वी तिला कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते.

रस्त्याने जाणारी एकटी-दुकटी तरुणी अथवा महिला दिसली, की तिच्यावर झडप घालायची अन्‌ वासना शमवून घ्यायची. या अमानवीय पाप कृत्याचा पुढे कुठलाही पुरावा शिल्लक राहू नये म्हणून तिलाच संपवून टाकायचे. काही नराधमांचे हे नृशंस वासनाकांड पाहून कदाचित प्राण्यांचीही मान शरमेने खाली जात असेल. महिला अत्याचाराच्या घटनांमुळे अवघा देश सुन्न झाला असताना पुन्हा 'यूपी'तील उन्नाव तिच्या किंकाळ्यांनी हादरले होते. हैदराबादमधील बलात्कार प्रकरणातील आरोपींचे पोलिसांनी एन्काऊंटर केल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनीही उन्नाव प्रकरणातील आरोपींना अशीच शिक्षा द्यावी अशी मागणी होत असताना आता पीडितेचाच मृत्यू झाला आहे.  

स्वत:वरील अत्याचाराचा पाढा न्यायदेवतेच्या कानी घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या पीडितेवरच सुडापोटी बेभान झालेल्या नर पिशाच्चांनी झडप घालत तिलाच पेटवून दिल्याचे पडसाद गल्लीपासून दिल्लीपर्यंत उमटले होते. विरोधकांनी संसदेमध्येही हा मुद्दा लावून धरला, तर उत्तर प्रदेशात काँग्रेसप्रमाणेच समाजवादी पक्षानेही भाजपवर ताशेरे ओढले. नेटिझन्सनी #unnaokibeti  या ट्रेंडखाली व्यक्त होत दोषींना कठोर शासन करण्याची मागणी केली आहे. 

देशभरातील महिला अत्याचाराच्या घटना वाढत असताना उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये पुन्हा माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. नेहमीप्रमाणे न्यायालयामध्ये सुनावणीसाठी जाणाऱ्या बलात्कार पीडितेला जामिनावर सुटलेल्या आरोपींनी जबर मारहाण करीत चाकूने भोसकले आणि त्यानंतर तिला पेटवूनही दिले. पीडित तरुणी यामध्ये नव्वद टक्के भाजली होती. या प्रकरणातील पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये पीडितेवर या नराधमांनी बलात्कार केला होता. सध्या या प्रकरणाची सुनावणी उन्नाव जिल्ह्यातील रायबरेली येथील न्यायालयामध्ये सुरू आहे. 

...तरीही ती एक किलोमीटर चालली 
नराधमांनी पीडित तरुणीला पेटवून दिल्यानंतर ती नव्वद टक्के भाजली. यानंतरदेखील ती एक किलोमीटर चालली आणि रस्त्याच्या शेजारीच असलेल्या एका घराबाहेरील व्यक्तीकडे तिने मदत मागितली. यानंतर तिने स्वत: 112 क्रमांकावर दूरध्वनी केला आणि पोलिसांना आपबिती सांगितली. यानंतर पोलिस आणि रुग्णवाहिकेने घटनास्थळी धाव घेत तिला रुग्णालयात दाखल केले होते.

उन्नावप्रकरणी "एसआयटी' स्थापन 
न्यायालयात सुनावणीसाठी जाणाऱ्या बलात्कार पीडितेला मारहाण करीत पेटवून दिल्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांचे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त मुकेश मेश्राम यांनी ही माहिती शुक्रवारी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unnao rape victim set on fire a year after being brutalised dies