मोदी लाटेतही फुललं नाही कमळ, आता SP च्या बालेकिल्ल्याला भाजप लावणार सुरुंग?|UP Assembly Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UP Assembly Election 2022

मोदी लाटेतही फुललं नाही कमळ, आता SP च्या बालेकिल्ल्याला भाजप लावणार सुरुंग?

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (UP Assembly Election 2022) चांगलीच रंगात आली असून आता निवडणुकीच्या तारखा देखील जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे पक्षांनी देखील राजकीय खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे. समाजवादी पक्षाचा (Samajwadi Party) बालेकिल्ला आणि २०१४ मध्ये मोदी लाटेतही भाजपला याठिकाणी यश मिळू शकले नव्हते असा कन्नौज मतदारसंघ आपल्या ताब्यात यावा यासाठी भाजपनं (BJP) पूर्ण तयारी केली आहे. त्याची जबाबदारी माजी पोलिस आयुक्त असीम अरुण (Former Police Commissioner Asim Arun) यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.

हेही वाचा: UP Election 2022: समाजवादी पार्टी आणि MIM एकत्र येणार? ओवैसी म्हणतात...

माजी पोलिस आयुक्त असीम अरुण हे मूळचे कन्नौजचे रहिवासी आहेत. असीम अरुण यांचे वडील दिवंगत श्रीराम अरुण हे उत्तर प्रदेश आयपीएस अधिकारी होते. ते यूपीचे डीजीपी देखील होते. यासोबतच त्यांची आई दिवंगत शशी अरुण या लेखिका होत्या. असीम अरुण यांचा जन्म 03 ऑक्टोबर 1970 रोजी बदाऊन येथे झाला. असीम अरुण यांचे सुरुवातीचे शिक्षण लखनौच्या सेंट फ्रान्सिस कॉलेजमध्ये झाले. यानंतर ते बीएस्सीचे शिक्षण घेण्यासाठी दिल्लीला गेले. असीम अरुण हे 1994 च्या बॅचचे आयपीएस आहेत. भारतीय पोलीस सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची यूपीच्या अनेक जिल्ह्यांमध्ये नियुक्ती झाली आहे.

भाजपचे खासदार आणि दोन आमदार कन्नौजमध्ये आहेत

कानपूर-बुंदेलखंड हा भाजपचा सर्वात मजबूत बालेकिल्ला आहे. कानपूर-बुंदेलखंड जिंकण्याबरोबरच समाजवादी पक्षाच्या बालेकिल्ल्यातही भाजपने कंबर कसली आहे. परफ्युमचे शहर कन्नौज हा समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपला कन्नौज पूर्णपणे ताब्यात घ्यायचे आहे. कन्नौजमध्ये भाजपचे खासदार आणि दोन आमदार देखील आहेत.

लोकसभा निवडणुकीत भाजपचा झेंडा -

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने कन्नौजची जागा जिंकून सपाला सर्वात मोठा धक्का दिला. भाजपचे सुब्रत पाठक अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यांचा पराभव करून कन्नौजचे खासदार झाले. कन्नौज लोकसभा मतदारसंघ 23 वर्षांनंतर भाजपच्या खात्यात आला. कन्नौज लोकसभा मतदारसंघ पहिल्यांदा चंद्रभूषण सिंह यांनी 1996 मध्ये भाजपने जिंकला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने कानपूर-बुंदेलखंडमधील 10 पैकी 10 जागा जिंकल्या.

भाजपला खंत -

2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने कन्नौजमधील तीनपैकी दोन विधानसभा जागांवर कमळ फुलवले होते. तिरवान विधानसभा मतदारसंघातून भाजपचे कैलाश राजपूत विजयी झाले होते, दुसरीकडे छिब्रामऊ विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या अर्चना पांडे यांनी दणदणीत विजय मिळवला होता. मात्र, कन्नौजच्या सदर विधानसभा जागेवर भाजपला कमळ फुलवता आले नाही. सपा नेते अनिल दोहरा यांनी या जागेवर विजय मिळवला होता. सदर जागेवर गेल्या 20 वर्षांपासून सपाची सत्ता आहे.

भाजपने घेराव सुरू केला -

कन्नौजच्या विधानसभा जागेसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. या जागेसाठी भाजप प्रामाणिक आणि प्रभावी चेहऱ्याच्या शोधात होती. भाजपने कानपूरचे पोलिस आयुक्त असीम अरुण यांना कन्नौज विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची तयारी केली आहे. असीम अरुण यांचा कन्नौजशी दीर्घकाळ संबंध आहे. सदर मतदारसंघातील सपाचे आमदार अनिल दोहरे हे जाटव समाजाचे आहेत. असीम अरुण यांच्या मदतीने भाजपला या जागेवर कमळ फुलवायचे आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :up election 2022
loading image
go to top