
आमदारांना उपचारासाठी लखनौच्या हिंद रुग्णालयात नेण्यात आलं; पण...
Arvind Giri : पाच वेळा आमदार राहिलेल्या भाजपच्या अरविंद गिरींचं चालत्या गाडीतच निधन
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमधील (Uttar Pradesh Lakhimpur Kheri) गोला मतदारसंघाचे पाच वेळा आमदार राहिलेले अरविंद गिरी (Arvind Giri) यांचं आकस्मिक निधन झालं. आज (मंगळवार) सकाळी आमदार लखीमपूर खेरी जिल्ह्यातील गोला येथून सभेसाठी लखनौला रवाना झाले. यावेळी सिधौलीजवळ चालत्या वाहनात त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
यानंतर आमदारांना उपचारासाठी लखनौच्या हिंद रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी भाजप आमदार अरविंद गिरी यांना मृत घोषित केलं. अरविंद गिरी (वय 65) हे सलग पाचव्यांदा गोला विधानसभा मतदारसंघातून (Gola Assembly Constituency) आमदार राहिले आहेत. 30 जून 1958 रोजी गोला गोकरणनाथ, यूपी इथं जन्मलेल्या अरविंद गिरी यांनी 1994 मध्ये समाजवादी पक्षातून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. 1995 मध्ये निवडणूक जिंकून ते गोलाचे नगराध्यक्ष झाले. यानंतर 1996 मध्ये प्रथमच सपाच्या तिकिटावर 49 हजार मतं मिळवून ते आमदार झाले. 2000 मध्ये ते पुन्हा पालिका परिषद गोलाचे अध्यक्ष झाले. त्यानंतर 2002 मध्ये सपाच्या तिकिटावर 14 व्या विधानसभेचे दुसऱ्यांदा आमदार झाले. 2005 मध्ये सपा सरकारच्या काळात अनिता गिरी यांची जिल्हा पंचायत अध्यक्षपदी निवड झाली.
2007 मध्ये पत्नी सुधा गिरी यांची गोला नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली. 2007 मध्ये पुन्हा तिसऱ्यांदा आमदार झाले. 2007-2009 मध्ये ते राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संबंधित समितीचे सदस्य होते. 2022 मध्ये भारतीय जनता पक्षाकडून गिरी पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले. मात्र, आज त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, लखीमपूर खेरी जिल्ह्यातील गोला विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार अरविंद गिरी यांचं निधन अत्यंत दुःखद आहे, असं त्यांनी नमूद केलंय.