फेसबुकवरून मैत्री, व्हॉट्सऍपवर चॅट अन् लगेच विवाह

वृत्तसंस्था
Wednesday, 28 August 2019

फेसबुकवर त्याने फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली अन् तिने तत्काळ स्वीकारली. व्हॉटसऍपवरून चॅट केले अन् लगेच लग्नाच्या बेडीत अडकले.

अमृतसर (पंजाब): सोशल मीडियासाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुकवर त्याने फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली अन् तिने तत्काळ स्वीकारली. दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतल्यानंतर व्हॉटसऍपवरून चॅट केले अन् दोन भिन्न देशातील दोघांनी लगेच विवाह केला.

अमेरिकेमधील इम्ली ऑलिन व अमृतसरमधील पवन कुमार यांच्यामध्ये सात महिन्यापूर्वी सोशल मीडियावरून प्रेम फुलले. इम्ली भारतात आल्यानंतर दोघांचा रविवारी (ता. 25) विवाह सोहळा पार पडला. दोघांच्या विवाहाची चर्चा परिसरात रंगली आहे.

पवन कुमार हा एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करतो तर इम्ली ही युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ दकोटा येथे शिक्षिका म्हणून काम करत आहे. पवन कुमार म्हणाला, 'सात महिन्यांपूर्वी फेसबुकवरून इम्लीला फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली होती. तिनेही तत्काळ स्वीकारली. फेसबुक चॅटवरून दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले व व्हॉट्सऍपवरून चॅटींग सुरू केली. चॅटींग करत असताना आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. प्रेमाच्या आणा-भाका झाल्यानंतर इम्ली भारतात आली. तिने सर्व परिस्थिती जाणून घेतल्यानंतर विवाह करण्याचा निर्णय घेतला. रविवारी आम्ही दोघे विवाहाच्या बंधनात अडकलो. पण, मला स्वप्नातही वाटले नव्हते की माझे फेसबुकवरून एखाद्या परदेशी युवतीशी प्रेमविवाह होईल म्हणून. सर्व स्वप्नवत होते पण हे घडले आहे.'

पंजाबी रितीरिवाजानुसार विवाह पार पडला. इम्लीने मेहंदी काढली होती. शिवाय, विवाहादरम्यान पंजाबी कपडे परिधान केली होती. इम्ली म्हणाली, 'फेसबुकवर मला अनेकजण फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवत होते. पण, पवन कुमारचे छायाचित्र पाहून त्याच्या प्रेमातच पडले. त्याचा चेहरा, त्याचे डोळे, केस खूप आवडले. शिवाय, तो खूप चांगला आहे. विवाह झाल्यामुळे आता अमृतसरमध्ये राहणार असून, येथील रितीरीवाज शिकून घेणार आहे. शिवाय, माझ्या हाताने विविध पदार्थ तयार करून त्याला खावू घालणार आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US girl and Punjabi boy: Love on Facebook marriage in Amritsar