

Middle East conflict
esakal
दुबई : (एपी/पीटीआय): इराण आणि त्याच्या समर्थक सशस्त्र गटांनी सोमवारी (ता. २) इस्राईल, काही अरब देश आणि मध्यपूर्वेतील अमेरिकी लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे व ड्रोन हल्ले केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्राईल आणि अमेरिकेने इराणवर व्यापक हवाई हल्ले चढवले. संघर्ष अनेक आघाड्यांवर पसरत असून, तणाव शिगेला पोहोचला आहे. कुवेतने चुकून तीन अमेरिकन एफ-१५ ई स्ट्राइक ईगल लढाऊ विमाने पाडल्याची कबुली अमेरिकन लष्कराने दिली; सर्व सहा वैमानिक सुरक्षित बाहेर पडले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येनंतर संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. इराण रेड क्रेसेंटच्या माहितीनुसार, अमेरिकी-इस्रायली मोहिमेत इराणमध्ये आतापर्यंत किमान ५५५ जण ठार झाले असून १३० हून अधिक शहरांवर हल्ले झाले. इस्राईलमध्ये ११, तर लेबनॉनमध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. कतार एनर्जीने द्रवरूप नैसर्गिक वायू उत्पादन तात्पुरते थांबवण्याची घोषणा केली, त्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारात खळबळ उडाली. तेलाच्या किमती झपाट्याने वाढल्या.