"उत्तर प्रदेशमध्ये जंगलराज शिगेला"

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 17 August 2020

गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमधून अनेक गुन्ह्यांच्या घटना समोर येत आहेत.

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमधून अनेक गुन्ह्यांच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे.  त्यांनी या संदर्भात ट्विट केलं असून उत्तर प्रदेशमध्ये जंगलराज शिगेला पोहोचला असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.  

उत्तर प्रदेशमध्ये एका 13 वर्षीय मुलीचा बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याची घडना ताजी असताना आझमगडमधील एका दलित सरपंचाने लवून नमस्कार न केल्याने त्यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घडना घडली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये जातीय हिंसा आणि बलात्काराचे जंगलराज शिगेला पोहोचले आहे. आता आणखी एक भयानक घटना घडली. दलित सरपंच सत्यमेव जयते यांनी लवून नमस्कार करण्यास नकार दिल्याने त्यांची हत्या करण्यात आली. सत्यमेव यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. 

मोठी बातमी : काँग्रेसमध्ये जवळपास १०० मोठे नेते नाराज; हवाय नेतृत्व बदल

सत्यमेव जयते यांनी ठाकूर समाजातील व्यक्तींना लवून नमस्कार करण्यास नकार दिला होता. याच रागातून त्यांची हत्या करण्यात आल्याचे सरपंचाच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. या घटनेचे गावात पडसाद उमटले. संतप्त जमावाने दगडफेक करत जाळपोळ केल्याच्या घटना घडल्या. पोलिस चौकीचीही तोडफोड करण्यात आली. सत्यमेव जयते हे आझमगडमधील बांसगावचे सरपंच होते. पहिल्यांदाच त्यांची सरपंचपदी निवड झाली होती. बांसगावमध्ये उच्च जातींच्या तुलनेत मागास जातीतील लोकांची संख्या टक्क्यांनी जास्त आहे. पण, गावातील कारभाराची सूत्रे ठाकूर समुदायाच्या हाती आहेत.

सत्यमेव जयते हे हत्या झाली त्यादिवशी गावाबाहेर असलेल्या एका खासगी शाळेसमोरून जात होते. त्याचवेळी त्यांना त्यांचे मित्र विवेक सिंह आणि सूर्यांश दुबे हे जेवणासाठी जवळच घेऊन गेले होते. याच दरम्यान त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर सत्यमेव जयते यांची त्यांनी गोळ्या घालून हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

'आम्ही राजकीय पक्ष, विचार बघत नाही'; फेसबुककडून आलं स्पष्टीकरण

या घटनेनंतर गावातील दलित समुदायातील नागरिकांनी रस्त्यावर येऊन संताप व्यक्त केला. यावेळी दगडफेक आणि जाळपोळही करण्यात आली. यात आठ वर्षाचा मुलगा जखमी झाला आहे. जोपर्यंत आरोपींनी अटक करून चौकशी केली जात नाही. तोपर्यंत सत्यमेव यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीप्रमाणेच तपास केला जाणार आहे. अद्याप हत्येचे कारण कळू शकलेले नाही, पण ही घटना गंभीर आहे, असं आझमगड क्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुभाषचंद्र दुबे म्हणाले.

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uttar pradesh incident rahul gandhi tweet up yogi aadityanath