
Ganga Vilas Cruise : मोदींनी उद्घाटन केलेल्या क्रूझचं भाडं लाखांत, तरीही दोन वर्षांची बुकिंग फुल
वाराणसीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी गंगा विलास क्रूझला हिरवा झेंडा दाखवला. जगातल्या सर्वात लांब क्रूझच्या यात्रेला कालपासून सुरुवात झाली. फाईव्ह स्टार लक्झरी सुविधा असलेल्या या क्रूझच्या बुकिंगवर लोकांच्या उड्या पडल्या आहेत.
या क्रूझचं भाडं लाखोंमध्ये आहे तरीही दोन वर्षांपर्यंत बुकिंग फुल झालेल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे विदेशी पर्यटक या क्रूझचा आनंद घेण्यासाठी पुढे आहेत. या क्रूझचे संचालक राज सिंह यांनी यासंदर्भात माहिती दिली.
शुक्रवार, दि. १३ जानेवारी रोजी वाराणसी येथून निघालेली ही क्रूझ शनिवारी उत्तर प्रदेशच्या गाजीपूरमध्ये पोहोचली. या क्रूझची चर्चा सध्या जगभरात आहे. या क्रूझला भारत आणि बांगलादेशच्या रिव्हर क्रूझ लाईनशी जोडलं गेलं आहे.
क्रूझचे डायरेक्टर राज सिंह यांनी सांगितलं की, सप्टेंबर २०२३ मध्ये ही क्रूझ पुन्हा वाराणसी ते डिब्रूगड जाईल. ती पुन्हा २०२४ मध्ये प्रवाशांना घेऊन वाराणसीला माघारी परतेल.
फाईव्ह स्टार लक्झरी सुविधा असलेल्या या क्रूझमध्ये पर्यटकांसाठी खास सुविधा आहेत. १८ सुट, स्पा सेंटर, रेस्टॉरंट, जिम, हॉलसह भरपूर सुविधा आहे. शिवाय सनबाथसाठी विशेष सोय करण्यात आलेली आहे.