बोगद्यात बचाव कार्य वेगात; बेपत्ता कामगारांच्या नातेवाइकांचा आक्रोश

पीटीआय
Thursday, 11 February 2021

या बोगद्यामध्ये आणखी ३० ते ३५ लोक अडकून पडल्याची भीती व्यक्त होत आहे. येथील हिमकडा कोसळल्यानंतर अलकनंदा आणि तिच्या उपनद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली होती.

जोशीमठ (उत्तराखंड) - तपोवनमधील ऊर्जा प्रकल्पाच्या बोगद्यात अडकून पडलेल्या कामगारांना सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी तपास यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असल्या तरीसुद्धा चिखलामुळे हे अधिकाधिक जिकिरीचे होत चालले आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या आज ३२ वर पोचली असून आणखी १७० जण बेपत्ता आहेत. 

या बोगद्यामध्ये आणखी ३० ते ३५ लोक अडकून पडल्याची भीती व्यक्त होत आहे. येथील हिमकडा कोसळल्यानंतर अलकनंदा आणि तिच्या उपनद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली होती. मागील तीन दिवसांपासून येथील कामगार बेपत्ता असले तरीसुद्धा ते जिवंत असतील, अशी आशा तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मोठ्या यंत्रांच्या माध्यमातून हा चिखल बाहेर काढण्याचे काम  सुरू आहे. आयटीबीपी, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ ही निमलष्करी दले  या मोहिमेमध्ये सहभागी झाली आहेत. हा बोगदा १२० मीटर लांबीचा असला तरीसुद्धा आतून चिखल आणि पाणी बाहेर पडत असल्याने आव्हाने वाढली आहेत, असे आयटीबीपीचे प्रवक्ते विवेककुमार पांडे यांनी सांगितले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नातेवाइकांची अधिकाऱ्यांशी हुज्जत
ऋषी गंगा प्रकल्पाच्या स्थळावरून वाहून गेलेल्या कामगारांच्या नातेवाइकांनी आज प्रकल्पस्थळी धाव घेत प्रशासनाच्याविरोधात आंदोलन केले.  तपास यंत्रणा बेपत्ता  कामगारांचा योग्य पद्धतीने  शोध घेत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.  आज जवळपास चाळीस लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास अधिकाऱ्यांशी वाद घातला. प्रशासनाचा भर या भागातील संपर्क यंत्रणा सुस्थापित करण्यावर असून बेपत्ता लोकांचा शोध घेण्यामध्ये त्यांना  रस नाही, असा आरोप पंजाबमधील एका व्यक्तीने केला. 

अत्याधुनिक उपकरणांचा वापर
उत्तराखंडमध्ये जल आपत्तीनंतर ऊर्जा प्रकल्पाच्या बोगद्यामध्ये अडकून पडलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी बचाव यंत्रणा रात्रंदिवस मेहनत करत आहेत. या यंत्रणांनी आता ड्रोन्स आणि रिमोट सेन्सिंग साधनांचा वापर करून कामगारांचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. मागील तीन दिवसांपासून येथे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. एनटीपीसीच्या ऊर्जा प्रकल्पाच्या आवारातून बेपत्ता झालेल्या कामगारांचा शोध घेतला जात आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uttarakhand disaster Rescue work in the tunnel workers relatives