

Uttarakhand Pahadi Diwali Tradition
sakal
डेहराडून : देशभरात दिवाळीचा सण प्रामुख्याने पाच दिवस साजरा केला जातो. मात्र, उत्तराखंडमधील गढवाल आणि कुमाऊँ भागात दिवाळीचा उत्सव वेगवेगळ्या टप्प्यांवर महिनाभर सुरू असतो. कार्तिक अमावस्येनंतर ११ दिवसांनी साजरी होणारी ‘इगास बग्वाल’ आणि त्यानंतर महिन्याने येणारी ‘मंगसीर बग्वाल’ किंवा ‘बूढी दिवाळी’ या येथील वैशिष्ट्यपूर्ण लोकपरंपरा आहेत. या उत्सवांमधून स्थानिक लोकजीवन, श्रद्धा आणि ऐतिहासिक परंपरांचे दर्शन घडते.
उत्तराखंडमध्ये कार्तिक अमावस्येला पारंपरिक पद्धतीने लक्ष्मी-गणेश पूजन करून दिवाळी साजरी केली जाते. कुमाऊँ भागात या काळात ‘ऐपण’ या पारंपरिक चित्रकलेला विशेष महत्त्व आहे. महिला गेरू आणि तांदळाच्या पिठापासून तयार केलेल्या पांढऱ्या रंगाच्या मिश्रणाचा वापर करून अंगणात, घराच्या प्रवेशद्वारावर आणि देवघरात नक्षीकाम करतात. ही कला शुभत्व आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते.