
उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात मंगळवारी मध्यरात्री आलेल्या अचानक पुराने आणि भूस्खलनाने हाहाकार उडाला. या नैसर्गिक आपत्तीने गावातील अनेक इमारती, दुकाने आणि घरं उद्ध्वस्त केली. यामध्ये जय भगवान या हॉटेल व्यावसायिकाचं चार मजली हॉटेलही पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेलं. या संकटात ६० हून अधिक लोक बेपत्ता झाले असून, आतापर्यंत दोन मृतदेह सापडले आहेत. जय भगवान यांनी सांगितलेला त्यांचा थरारक अनुभव या आपत्तीचं भयावह चित्र डोळ्यासमोर उभं करतो.