मोदींनी चहा विकलेले वडनगर रेल्वे स्थानक झाले ब्रॉडगेज

संतोष शाळिग्राम
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

नूतनीकरण पूर्ण; नव्या स्थानकावरून पंतप्रधान दाखविणार रेल्वेला हिरवा झेंडा 

वडनगर (गुजरात) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या ठिकाणी चहा विकला, ते वडनगर गावातील रेल्वे स्थानक नव्या रूपात ब्रॉडगेज रेल्वेच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. दिवाळीच्या सणापूर्वी नरेंद्र मोदी या स्थानकावरून रेल्वेला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. 

वडनगरचा रेल्वेमार्ग पूर्वी मीटरगेज होता. अनेक वर्षे त्यावरून वाफेवर चालणाऱ्या इंजिनला जोडलेले डबे असणारी रेल्वेगाडी धावत होती. अहमदाबाद ते तारंगापर्यंत ही गाडी जायची. नंतर मेहसाणा ते तारंगापर्यंत डेमू सुरू झाली. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी वडनगर रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण आणि या मार्गाच्या विस्तार प्रकल्पाला मंजुरी दिली. 

त्यासाठी वडनगर रेल्वेमार्गावरील वाहतूक 22 डिसेंबर 2016 रोजी बंद करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून या मार्गाचे काम सुरू आहे. मीटरगेजचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये करण्यात आले आहे. यामुळे मेहसाणा जंक्‍शन येथे मुंबई आणि अन्य राज्यातून येणाऱ्या नियमित रेल्वेगाड्या या मार्गे धावू शकणार आहेत. पुढे राजस्थानधील माऊंट आबूपर्यंत हा मार्ग जोडण्यात येणार आहे. 

पर्यटनाला चालना 
"वडनगर हे पुरातन गाव आहे. पर्यटनमूल्य असलेली अनेक ठिकाणे, तीर्थस्थळे या गावात आहेत. वडनगरशेजारी सुमारे 40 किलोमीटर अंतरावर पुरातन जैन मंदिर आणि त्यापुढे सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर अंबाजी येथे प्राचीन काळातील आंबामातेचे मंदिर आहे. ही सर्व गावे रेल्वेमार्गावर आहेत. त्यामुळे नव्या रेल्वेमार्गामुळे पर्यटनाला चालना मिळेल,'' असा विश्‍वास स्थानिक प्राध्यापक डॉ. रणजितसिंह राठोड यांनी व्यक्त केला. 

"रेल्वेमार्ग ब्रॉडगेज व्हावा, ही वडनगरवासीयांची मागणी 40 वर्षांपासून होती. दोन वेळा वेळा गुजरातमधील दोघे केंद्रीय रेल्वेमंत्री होते, पण सुधारणा झाली नाही. मोदी पंतप्रधान झाले आणि 2017 पासून नव्या स्टेशनचे काम सुरू झाले. ते पूर्ण होत आले आहे,'' असे राठोड सांगतात. स्थानिक स्टेशन मास्तरांच्या म्हणण्यानुसार, नव्या मार्गावर वाहतुकीच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीत या मार्गावर रेल्वे वाहतूक सुरू होईल. 

आकर्षक बांधणी 
वडनगर हे मोदी यांचे जन्मगाव असल्याने तेथील रेल्वे स्थानकाची बांधणी आकर्षक करण्यात आली आहे. त्यासाठी लालरंगाचा धौलपुरी दगड खास राजस्थानवरून मागविण्यात आला आहे. त्याची बांधणी करताना प्राचीन रूप देण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. वडनगरचे वैभव समजले जाणारे कीर्ती तोरणाचा (कमान) आकार प्रवेशद्वाराला देण्यात आला आहे. 

चहाच्या दुकानाचे जतन होणार 
"पंतप्रधान मोदी यांचे वडील दामोदरदास यांचा चहा विक्रीचा व्यवसाय होता. स्थानकांवर त्यांचे दुकान जुन्या स्थितीत अजूनही आहे. त्याचा परवाना अजून त्यांच्या नावावर आहे. मोदी लहान असताना त्यांनीही या स्थानकावर चहा विकला आहे. त्यामुळे त्या चहाच्या दुकानाचे आहे त्या स्थितीत जतन केले जाणार आहे. ते सर्वांना पाहता यावे म्हणून ते काचेने बंदिस्त केले जाणार आहे,'' असे भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी सुनील मेहता यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vadnagar railway stations become Broadgages