Vidhan Sabha 2019 : ‘वंचित आघाडी’च्या मिनतवाऱ्या कशाला?

सकाळ न्यूज नेटवर्क 
Wednesday, 28 August 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने सोबत यावे, यासाठी काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी प्रकाश आंबडेकरांच्या चालविलेल्या मिनतवाऱ्यांमुळे संतप्त झालेल्या पक्षश्रेष्ठींनी, ‘आंबेडकरांवर अवलंबून न राहता कामाला लागा,’ अशा शब्दांत खडसावल्याचे समजते.

विधानसभा 2019 
नवी दिल्ली -  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने सोबत यावे, यासाठी काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी प्रकाश आंबडेकरांच्या चालविलेल्या मिनतवाऱ्यांमुळे संतप्त झालेल्या पक्षश्रेष्ठींनी, ‘आंबेडकरांवर अवलंबून न राहता कामाला लागा,’ अशा शब्दांत खडसावल्याचे समजते.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा सपाटून पराभव झाल्यानंतर प्रदेशपातळीवरील काही नेत्यांनी तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधींसमोर झालेल्या आढावा बैठकीत या पराभवाला प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी जबाबदार असल्याचे म्हटले होते. वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या मतांची टक्केवारी पाहता लोकसभेच्या सुमारे डझनभर जागा काँग्रेसला केवळ ‘वंचित’च्या उमेदवारांमुळेच गमवाव्या लागल्याचे रडगाणेही या नेत्यांनी गायले होते. त्यावर, ‘वंचित’वर खापर फोडण्याऐवजी काँग्रेसला जनतेने का स्वीकारले नाही? याचा विचार करा, असे राहुल गांधींनी फटकारले होते. तसेच अशा संभाव्य आघाडीची शक्‍यताही फेटाळून लावली होती. राज्याचे प्रभारी सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे यांनीही आंबेडकरांशी चर्चेला साफ नकार दिला होता. दुसरीकडे, सोनिया गांधींनी काँग्रेसमधीलच दलित आणि अल्पसंख्याक नेत्यांना पुढे आणण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.

‘वंचित आघाडी’चे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या जागावाटपाच्या अवाजवी मागण्या आणि काँग्रेसला तुच्छ लेखण्याच्या प्रकारामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते, नेत्यांमध्ये नाराजी आहे. आंबेडकरांनी आघाडीसाठी निम्म्या म्हणजे १४४ जागांची मागणी करताना राष्ट्रवादी काँग्रेसशी मैत्री तोडण्याची पूर्वअटही घातली होती. अर्थातच, काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने राष्ट्रवादी काँग्रेससोबतची आघाडी संपुष्टात आणण्याची कोणतीही पूर्वअट धुडकावून लावली. 

दरम्यान, काही प्रदेश नेत्यांनी पक्षश्रेष्ठींच्या कानावर राज्यातील परिस्थिती घालताना अल्पसंख्याक समाजाला किमान वीस जागा मिळाव्यात; तर दलित, मागासवर्गीयांना त्यांच्या राखीव जागा वगळून आणखी अतिरिक्त जागा द्याव्यात, अशी सूचना केली आहे. या व्यूहरचनेतून प्रकाश आंबेडकरांचा प्रभाव कमी करता येईल, असा प्रस्ताव पुढे आल्याचे काँग्रेस सूत्रांनी सांगितले.

सव्वाशेचा फॉर्म्युला निश्‍चित?
विधानसभेच्या २८८ जागांपैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी १२५ जागा लढण्यास मान्यता दिल्याचे आणि उर्वरित ३८ जागा मित्रपक्षांना देण्याचा ‘फॉर्म्युला’ निश्‍चित झाल्याचे समजते. अर्थात, दोन्ही काँग्रेसकडून अद्याप या माहितीला दुजोरा मिळालेला नाही.

वंचित सोडणार काँग्रेसचा हात 
सोलापूर : विधानसभा निवडणुकीत १४४ जागा आणि मुख्यमंत्रिपद द्यावे, असा प्रस्ताव वंचित बहूजन आघाडीने काँग्रेसला दिला आहे. निर्णयासाठी ‘वंचित’ने ऑगस्ट अखेरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. मात्र, काँग्रेसला हा समझोता अमान्य असल्याने वंचित बहुजन आघाडी स्वबळावरच लढेल, असे सूत्रांनी सांगितले. त्यांचे ‘एमआयएम’ला सोबत घेण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. परंतु, अद्याप सकारात्मक चर्चा झाली नसल्याचेही सांगण्यात आले. लोकसभा निवडणुकीत ४० लाखांहून अधिक मते घेतल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही चांगली मते मिळतील आणि ५० हून अधिक आमदार विजयी होतील, असा विश्‍वास ‘वंचित’ला वाटू लागला आहे. ‘एमआयएम’लाही आता अस्तित्वाची जाणीव झाल्याने त्यांनीही आपला हिस्सा मागण्यास सुरवात केली आहे. मात्र, समाजातील वंचित घटकांमधील युवकांना उमेदवारीची संधी मिळावी, अशी भूमिका ॲड. आंबेडकरांनी कायम ठेवली आहे. त्यामुळे ‘एमआयएम’ आता स्वबळावर लढणार की ‘वंचित’ किंवा काँग्रेससोबत जाणार, याची उत्सुकता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vanchit bahujan aghadi congress