IRCTC : वंदे भारत रेल्वेगाड्यांत केवळ शाकाहारी जेवण; आयआरसीटी-सात्त्विकचा करार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वंदे भारत रेल्वेगाड्यांत केवळ शाकाहारी जेवण

वंदे भारत रेल्वेगाड्यांत केवळ शाकाहारी जेवण

नवी दिल्ली : वंदे भारत योजनेनुसार सुरु करण्यात आलेल्या रेल्वेगाड्यांमध्ये केवळ शाकाहारी जेवण व खाद्यपदार्थ ठेवण्याचे उद्दिष्ट आयआरसीटीसीने आखले आहे. सात्त्विक कौन्सिल ऑफ इंडियाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अशी योजना अमलात आणली जाईल.

दिल्ली ते कटरा या गाडीपासून यास प्रारंभ होईल. आणखी १८ रेल्वेगाड्यांत ही योजना लागू केली जाईल. केवळ खाद्यपदार्थच नव्हे तर स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू, साबण आणि इतर गोष्टींबाबतही हे लागू होईल. या रेल्वेगाड्यांत भोजनसेवा पुरविणाऱ्यांना मांसाहारी पदार्थांना हातही लावलेला नसेल. भोजनगृहात पदार्थ शिजविणाऱ्यांच्या बाबतीतही हे लागू होईल. दिल्ली आणि कटरा येथे त्यासाठी स्वयंपाकघर सज्ज केले जाईल. याशिवाय एका हॉटेलच्या एका मजल्यावरही अशी दक्षता घेतली जाईल.

तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये ही योजना राबविण्यासाठी आयआरसीटीसी आणि सात्त्विक कौन्सिल ऑफ इंडिया यांच्यात करार झाला. दिल्ली-कटरा गाडी ही वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांसाठी सुरु करण्यात आली आहे.

पीएनआरमध्येच तरतूद

सात्त्विक कौन्सिल ऑफ इंडिया या स्वयंसेवी संस्थेचे अधिकारी वितुर्व पाठक यांनी सांगितले की, सात्त्विक प्रमाणपत्र मिळालेल्या रेल्वेगाड्यांत शाकाहारी प्रवाशांना इ-केटरिंगशिवाय दुसरे अन्नपदार्थ मागविता येऊ नयेत म्हणून त्यांच्या पीएनआर क्रमांकातच कोडिंगसाठी आम्ही डिजिटल पर्यायांची चाचपणी करीत आहोत. अशा प्रवाशांना केवळ शाकाहारी पदार्थांचेच पर्याय निवडता येतील. पर्यटनात शाकाहारी प्रवासी वाढत्या संख्येने प्रभावशाली ग्राहकवर्गाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांना शाकाहारी अन्न आणि सुविधा हव्या असतात, असेही त्यांनी नमूद केले.

loading image
go to top