
ज्ञानवापी, मंदिर-मशीद आंदोलनात संघ किंवा संघपरिवार थेटपणे उतरणार नाही...
नवी दिल्ली - वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणावरून सध्या उसळलेल्या चर्चेत संघपरिवाराच्या बाजूने एक सूचक व महत्वाचे विधान आले आहे. ‘ज्ञानवापी किंवा यापुढील कोणत्याही मंदिर-मशीद वादंगात किंवा आंदोलनात संघ किंवा संघपरिवार थेटपणे उतरणार नाही, असे वरिष्ठ संघसूत्रांनी आज अनौपचारीकरीत्या बोलताना सांगितले. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘काशी मथुरा बाकी है‘ या पुढील अध्याय सुरू झाल्याचे वातावरण सध्या आहे त्या पार्श्वभूमीवर थेट संघाच्या बाजूने आलेले हे विधान महत्वाचे व सूचक मानले जाते.
रामजन्मभूमी -बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल गतवर्षी आला तेव्हा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिलीत निवडक पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी, रामजन्मभूमी आंदोलनातील एका विशिष्ट स्थितीत संघ दिवंगत सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या काळापासून सक्रियरीत्या उतरला होता. मात्र यापुढे मंदिरांवर मशीद उभारण्याच्या घटनांबाबतच्या अशा आंदोलनात संघ प्रत्यक्ष सहभागी होणार नाही. त्याची तशी गरजही नाही असे भागवत यांनी नमूद केले होते. संघनेते सुनील आंबेकर यांनी आज दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना,‘‘ज्ञानवापी मुद्यावर बरीच चर्चा सुरू आहे. मात्र सत्य व तथ्य (पुरावे) सर्वांसमोर आले पाहिजेतत' असे सांगितले. वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीतील तळघराच्या खोल्यांत शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू संघटना करीत आहेत. तर ते शिवलिंग नसून मशिदीच्या ‘वजूखान्याला‘ पाणीपुरवठा करण्यासाठी तयार केलेला तो फवारा आ, असा मुस्लिम पक्षाचा दावा आहे.
दरम्यान संघसूत्रांच्या मते वाराणसी, मथुरा व इतर अनेक ठिकाणी मंदिरे उध्वस्त करून मशिदी बांधल्याचा इतिहास आहे. यातील सत्य परिस्थिती देशासमोर येण्यासाठी न्यायव्यवस्था आपले काम बजावत आहे व यापुढेही न्यायव्यवस्थाच यात ‘दूध का दूध, पानी का पानी' अशी भूमिका बजावेल. संघपरिवार यापुढील आंदोलनात सक्रियपणे सहभागी होणार नाही. मात्र एतिहासिक सत्य जगासमोर येणेही आवश्यक आहे. त्यासाठी लोकभावना व लोकांचे आंदोलन हे स्वयंंस्फूर्तीने यापुढे उभे राहील. मात्र रामजन्मभूमीप्रमाणे अशा ठिकाणांबाबत संघपरिवाराने सक्रिय भूमिका घेण्याची शक्यता नाही. रामजन्मभूमीचे आंदोलन एका विशिष्ट कालावधीत उभे राहिले होते असेही सूत्रांनी नमूद केले.
हिंदू महासभा-जामा मशीद
दिल्लीतील एतिहासिक जामा मशिदीच्या पायऱयांचे उत्खनन करावे अशी मागणी अखिल भारतीय हिंदू महासभेने केली आहे. महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व शाही इमाम बुखारी यांना पत्रेही लिहीली आहेत. जामा मशिद ही मुळात एक मंदिर पाडून उभारण्यात आली होती. या मशिदीखाली आजही अनेक हिंदू देवदेवांच्या मूर्ती आहेत. त्यामुळे या मशिदीच्या पायऱया व आवारात खओदकाम करावे. भारतीय पुरातत्व विभागाने तसे करून यातील सत्य जगासमोर आणावे अशीही मागणी चक्रपाणी महाराज यांनी पत्रात कली आहे.
Web Title: Varanasi Gyanvapi Mosque Survey Gyanvapi Sangh Parivar Will Not Directly Participate In Temple Mosque Protest
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..