अटलजींच्या भाषणाची क्लीप शेअर करत वरूण गांधींचा भाजपला घरचा आहेर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP

अटलजींच्या भाषणाची क्लीप शेअर करत वरूण गांधींचा भाजपला घरचा आहेर

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळण्यात आलेले भारतीय जनता पक्षाचे खासदार वरुण गांधी, यांनी पून्हा एकदा भाजपला घरचा आहेर दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून वरूण गांधी आणि त्यांच्या आई मनेका गांधी हे केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनात भुमिका घेताना दिसता आहेत. वरूण गांधी यांनी पून्हा एकदा दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या भाषणातील एक व्हीडिओ शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे.

वरूण गांधी यांनी शेअर केलेली ही व्हीडिओ क्लिप 1980 च्या दशकातील असून, यामध्ये वाजपेयींनी तत्कालीन काँग्रेस सरकारला शेतकऱ्यांवर दडपशाही करू नका असा इशारा दिला होता. "आम्ही सरकारला चेतावणी देत आहोच, दडपशाही करणे सोडून द्या, शेतकरी घाबरणार नाही, शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आम्ही राजकीय वापर करू इच्छित नाही, मात्र त्यांच्या मागण्यांचं आम्ही समर्थन करतो. मात्र जर सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात कायद्याचा दुरूपयोग करत असेल तर या लढाईत आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत." असा इशारा अटल बिहारी वाजपेयी यांनी या व्हीडिओमध्ये दिल्याचं पाहायला मिळतंय.

खासदार वरूण गांधी यांनी लखीमपूर खेरी हिंसाचारासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेत भाजप नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने चार शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणात आशिष मिश्रा यांना अटक देखील करण्यात आली आहे.